समोशांच्या कारखान्यात सिलेंडरचा भडका, पुण्यात कर्वेनगरमधील घटना, चौघं भाजले
एबीपी माझा वेब टीम | 11 Feb 2019 12:43 PM (IST)
कारखान्यात चार मजूर सकाळी सहा वाजताच्या सुमारास सामोसे तयार करत असताना शेगडीला गॅस पुरवठा करणाऱ्या सिलेंडरची नळी निघाली आणि गॅसचा मोठा भडका उडाला.
पुणे : पुण्यात सामोसे तयार करण्याच्या कारखान्यात सिलेंडरचा भडका उडाला. यामध्ये चार मजूर गंभीर जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. पुण्यात कर्वेनगर भागात मुख्य चौकाजवळ असलेल्या भालेकर एम्पायर इमारतीच्या तळ मजल्यावर सामोसे तयार केले जातात. या कारखान्यात चार मजूर सकाळी सहा वाजताच्या सुमारास सामोसे तयार करत होते. त्यावेळी शेगडीला गॅस पुरवठा करणाऱ्या सिलेंडरची नळी निघाल्याने गॅसचा मोठा भडका उडाला. सामोसे तयार करणारे अन्नू चौहान आणि इतर तिघे जण यामध्ये गंभीर जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गॅसचा भडका एवढा मोठा होता की त्यातला एक जण काही अंतरावर फेकला गेला. या प्रकरणी वारजे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.