Cyber Crime Report : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात सध्या सायबर गुन्ह्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यात हॅकिंग, हनी ट्रॅप, सेक्स्टॉर्शन, क्रेडिट कार्ड फ्रॉड या सगळ्या सायबर क्राईमच्या प्रकारातून अनेकांची फसवणूक केली जाते. त्यातून कोट्यवधी रुपये उकळले जातात. शहरात बाकी गुन्ह्यांसोबतच या सायबर गुन्ह्यांची संख्यादेखील वाढत आहे. या हनीट्रॅप, सेक्सटॉर्शन सारख्य़ा गुन्ह्यांमध्ये नागरिक तक्रारी दाखल करण्यासाठी घाबरतात. अनेकदा कुटुंबियांच्या भीतीमुळेदेखील तक्रारी दाखल केल्या जात नाही. पैशांच्या फसवणुकीच्या अशा प्रकारात ज्येष्ठांना टार्गेट केलं जातं. मात्र या संदर्भात पोलिसांत तक्रार कशी दाखल करावी हे सामान्यांना बऱ्याचदा माहित नसतं. त्यामुळे नागरिकांना यासंदर्भात माहिती देण्यासाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. सायबर गुन्ह्यांची तक्रार कशी करावी?, यासाठी काही पर्याय सुचवले आहेत. 


सायबर क्राईमची तक्रार कऱण्यासाठी चार पर्याय सुचवले आहेत. त्यातील तुम्हाला सोपा आणि सोयीचा मार्ग नागरिकांनी निवडावा आणि अशा प्रकारच्या गुन्ह्यांबाबत त्वरीत तक्रार करावी, असं सायबर पोलिसांकडून आवाहन करण्यात आलं आहे. त्यात पोर्टल तक्रार,  ईमेल तक्रार, वॉक-इन तक्रार, टेलिफोन तक्रार, स्थानिक पोलिस स्टेशन तक्रार हे चार पर्याय तक्रारीसाठी वापरु शकतात. 


कोणते आहेत पर्याय?


पोर्टल तक्रार: पीडित व्यक्ती www.cybercrime.gov.in या अधिकृत सायबर क्राईम पोर्टलद्वारे ऑनलाइन तक्रारी दाखल करू शकतात. या वेबसाईटवर गेल्यानंतर गुन्ह्याचा प्रकार निवडून संपूर्ण माहिती द्यावी लागणार आहे. 


ईमेल तक्रार: व्यक्ती cybercell.pcpc-mh@mahapolice.gov.in वर ईमेल पाठवू शकतात. संबंधित स्क्रीनशॉटसह गुन्ह्याचे तपशीलवार खातं पाठवू शकतो. या मेलमध्ये संपूर्ण माहिती देणं महत्वाचं असेल. गुन्हा कसा झाला, तक्रार काय आहे?, यासंदर्भात संपूर्ण माहिती द्यावी लागणार आहे. 


वॉक-इन तक्रार: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या दुसऱ्या मजल्यावर, प्रेमलोक पार्क, चिंचवड, MH 411033 येथे  सायबर सेलच्या कार्यालयात जाऊन तुम्ही तक्रार नोंदवू शकता. 


टेलिफोन तक्रार: पीडित व्यक्ती त्यांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी आणि मदत मागण्यासाठी थेट PCMC पोलिसांच्या सायबर सेलशी 02027350939 वर संपर्क साधू शकतात. त्यावेळी गुन्ह्यांसदर्भाती सगळी माहिती देणं गरजेचं असेल. 


स्थानिक पोलिस स्टेशन तक्रार: पिंपरी-चिंचवडमध्ये सायबर गुन्ह्यांची संख्या जास्त आहे. त्यात अनेकांची फसवणूकदेखील होते.  पोलीस स्टेशन गाठणे, हा तक्रार नोंदवण्यासाठी सगळ्यात सोपा पर्याय आहे. सायबर फसवणुकीसंदर्भात तक्रार नोंदवण्यासाठी PCMC मधील 18 पैकी कोणत्याही पोलीस स्टेशनला भेट देऊ शकतात.