पुणे: अनेक सिग्नल भेदून पुण्याच्या हिंजवडीत दाखल होणाऱ्या आयटीयन्सना वन वेचा फायदा होऊ लागला आहे. मात्र याला व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे, तर गावकऱ्यांनी काही पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. पण जगाच्या नकाशावर हिंजवडीची ओळख अबाधित ठेवायची असेल तर हिंजवाडीकरांनी वन वेची कळ सोसायला हवी.


जगाच्या नकाशावर आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याच्या हिंजवडीमध्ये ट्रॅफिक जॅमची मोठी समस्या आहे. सध्या वन वे मुळे त्याला चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे ट्रॅफिकची समस्या मोठ्या प्रमाणात सुटली आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी प्रायोगिक तत्वावर सुरु केलेल्या वन वे नंतर हा बदल घडला आहे. आधी पुण्याहून येणाऱ्या आयटीयन्सना किमान दीड तर पिंपरी चिंचवडहून येणाऱ्यांना किमान एक तास प्रवास करावा लागायचा. आता मात्र अर्धा तास वेळ कमी लागतोय.

रोज येणारी दीड लाख वाहनं, अरुंद रस्ते आणि रस्त्यांवरील अतिक्रमणं यामुळं होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी, तूर्तास हाच पर्याय महत्वाचा दिसतोय. मात्र याला व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे, तर गावकऱ्यांनी त्यांच्यासाठी काही पर्याय उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे.

हिंजवडीचे नाव जगाच्या नकाशावर पोहोचवण्यात आयटीयन्सचाच मोठा हातभार आहे. ते या वाहतूक कोंडीची कळ सोसून हिंजवडीत दाखल होत असतील, तर हिंजवडीकरांनी जगाच्या नकाशावरील हे नाव अबाधित राहण्यासाठी थोडी कळ सोसायला हरकत नाही.