वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे शहरामध्ये ध्वनी प्रदूषणाची पातळी मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. त्यामध्ये वाहनांच्या कर्णकर्कश्श हॉर्नचा वाटाही मोठा आहे. पुण्यात दररोज एक कोटी वेळा हॉर्न वाजत असल्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर 'हॉर्न नॉट ओके प्लीज' ही मोहीम हाती घेण्यात आली. त्या अंतर्गत आज 'नो हॉर्न डे' साजरा करण्यात आला.
पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडे 31 जुलैपर्यंत 37 लाख 16 हजार 699, पिंपरी चिंचवड कार्यालयाकडे 17 लाख 70 हजार 784 तर बारामती कार्यालयाकडे तीन लाख 85 हजार 408 वाहनांची नोंद आहे. पुणे जिल्ह्याची एकूण वाहनसंख्या 58 लाख 72 हजार 891 इतकी आहे.
या वाहनांपैकी किमान 25 टक्के वाहनांचा दैनंदिन वापर होतो. प्रत्येक वाहनचालक किमान पाच ते दहा वेळा हॉर्नचा वापर करतो. केवळ पुणे शहराचा विचार केल्यास दिवसभरात किमान एक कोटी वेळा हॉर्न वाजवला जातो, अशी माहिती आरटीओ कार्यालयाच्या मार्फत देण्यात आली.