मुंबई: महाराष्ट्र विधानसभा 288 सदस्यांचा काल शपथविधी प्रक्रिया पार पडली. यावेळी एक गंमतीशीर गोष्ट घडली, यामुळे सभागृहात हास्यकल्लोळ दिसून आला. कसबा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार हेमंत रासने (Hemant Rasane) विरोधी पक्षांच्या बाकावर जाऊन बसले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हेमंत रासने यांच्या हाताला धरून पुन्हा सत्ताधारी नेत्यांच्या बाकावर बसवलं.


काल विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या आमदारांचा शपथविधी पार पडला. यादरम्यान हेमंत रासने यांनी विधानसभा सभागृहात प्रवेश केला. त्यावेळी रासने यांची विरोधी पक्षाच्या बाकावर जाऊन बसण्याची चूक झाली. यावेळी अजित पवार हे सभागृहात उपस्थित होते. त्यांनी हेमंत रासने यांना हाताला धरून सत्ताधारी बाकावर नेले. या घटनेनंतर सभागृहात हास्यकल्लोळ उडाला. यावेळी हेमंत रासने (Hemant Rasane) यांनीही चूक लक्षात येताच गालातल्या गालात हसले आणि अजित पवार यांच्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले. हेमंत रासने यांनी कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात भाजपकडून काँग्रेसचे रविंद्र धंगेकर यांच्या विरोधात निवडणूक लढवली, आणि त्यांनी विजय मिळवला.


कसब्याचा विजय


हेमंत रासने (Hemant Rasane) यांनी भारतीय जनता पक्षाकडून दुसऱ्यांदा विधानसभा निवडणूक लढवली, पहिल्यांदा त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. मात्र, आत्ता झालेल्या विधानसभेला त्यांना पुन्हा काँग्रेसच्या ताब्यात गेलेला गड परत मिळवला. कसबा पेठ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. कसबा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला होता. पण 2023 च्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने या मतदारसंघात विजय मिळवला होता. त्याचा वचपा काढत मोठ्या मताधिक्यांनी हेमंत रासने विजयी झाले. हेमंत रासने (Hemant Rasane) हे पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष देखील राहिले आहेत. 


हेमंत रासने जागा चुकले


पुण्यातील कसबा मतदारसंघातून निवडून आलेले भाजपचे हेमंत रासने (Hemant Rasane) विरोधी पक्षाच्या बाकावर जाऊन बसले. ही बाब उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या लक्षात आली. त्यांनी शपथ घेतल्यानंतर रासने यांना हाताला धरून सत्ताधारी बाकावर बसवलं. 


पहिल्याच दिवशी विरोधकांचा सभात्याग


नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी आणि विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यासाठी विशेष अधिवेशन सुरू झालं. पण पहिल्याच दिवसाची सुरुवात झाली विरोधकांच्या सभात्यागानं. आमदारकीची शपथ घेण्याआधीच विरोधकांनी बहिष्कार टाकला. एकीकडे सत्ताधारीच शक्तिप्रदर्शन करत असताना मविआचे आमदार मात्र शांतपणे विधानभवनात पोहोचले. हंगामी अध्यक्षांनी राज्यपालांच्या आदेशाचं वाचन करत शपथविधी सुरू होत असल्याचं सांगितलं. त्यावेळी आदित्य ठाकरेंसह विरोधकांनी सभात्याग केला. नाना पटोलेंसह विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांच्या नावांची शपथविधीसाठी घोषणा झाली, पण ते सभागृहात नव्हते. सभागृहात या घडामोडी घडत असताना दुसरीकडे सभागृहाबाहेर जितेंद्र आव्हाडांनी थेट आय लव्ह मारकडवाडीचे पोस्टर्स झळकावले.  आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाडांसह मविआच्या आमदारांनी शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करत आज शपथ न घेण्याची घोषणा केली.