पुणे : शहरासह जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुसळधार पावसामुळे आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला असून शेकडो वाहनं वाहून गेली आहेत. अनेक घरांचं नुकसान झालं आहे. रस्त्यांवर जागोजागी पाणी साचल्यामुळे अनेक लोक अडकले आहे. स्थानिक लोकांकडून मदतकार्य सुरु आहे. पुण्यातल्या अरण्येश्वर भागातील टांगेवाला कॉलनीत मध्यरात्री पाणी भरायला लागल्यानंतर लोक आसरा शोधण्यासाठी शेजारच्या गंगातीर्थ सोसायटीमध्ये पोहचले. लोक सोसायटीच्या कंपाऊंड वॉल जवळ उभे असतानाच पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे कंपाऊंड वॉल लोकांच्या अंगावर कोसळली. त्यामध्ये काही लोकांचा मृत्यू झाला तर काही लोक आंबील ओढ्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गेले. या घटनेत एकूण सात जणांचा मृत्यू झाल्याचे इथल्या लोकांचं म्हणणं आहे. दरम्यान, मध्यरात्रीपासून संपूर्ण पुणे शहराचा वीजपुरवठा बंद आहे. काही ठिकाणी विजेचे ट्रान्सफॉर्मर्स पाण्यात वाहून गेले आहेत. त्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. पुढील पाच दिवस शहराच्या पाणीपुरवठ्यावरही परिणाम होणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे. महापालिकेकडून सांगण्यात आले आहे की, अतिवृष्टीमुळे पद्मावती पंपिंग स्टेशनमध्ये पाणी शिरलं आहे, त्यामुळे सर्व पंप/मोटार नादुरूस्त झाले आहेत. परिणामी पद्मावती पंपिंग स्टेशनवर अवलंबून असणाऱ्या बिबवेवाडी, कोंढवा, मर्केट यार्ड परिसर, धनकवडी, बालाजी नगर, सहकार नगर परिसर, सातारा रोड परिसर भागांना पाणीपुरवठा होणार नाही.