पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हे उद्या (26 सप्टेंबर गुरूवारी) पुणे दौऱ्यावर येणार आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते भुयारी मेट्रोचे उद्धाटन केले जाणार आहे. तर स्वारगेट ते कात्रज या नव्या मेट्रो मार्गाचे भूमीपूजन मोदींच्या हस्ते होणार आहे. या निमित्ताने पुण्यात जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे. मात्र, मोदींच्या या दौऱ्यावर पावसाचं सावट दिसून येत आहे. पुण्यात पुढील 3 ते 4 दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, अशातच आज मोदीच्या सभेची आणि सर्व व्यवस्थेची जय्यत तयारी करण्यात आली मात्र, ज्या ठिकाणी मोदींची सभा होणार आहे, त्याठिकाणी मोठा चिखल आणि पाणी साचल्याचं दिसून येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) उद्या पुणे दौऱ्यावर येणार आहेत. एसपी कॉलेजच्या ग्राऊंडवर त्यांची सभा होणार आहे. ज्या मार्गाने मोदी स्टेजवर जाणार आहे. त्या मार्गावर आणि मैदानावर सगळीकडे चिखलाचं साम्राज्य पसरलं असल्याचं दिसून येत आहे. महत्वाचं म्हणजे मोदी ज्या स्टेजवरून पुणेकरांना संबोधित करणार आहे. त्या स्टेजखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे, त्या ठिकाणी चिखल झालेला आहे. महापालिका आणि मेट्रोचे अधिकारी सभास्थळी पाहणी करत आहेत. त्याचबरोबर सभेसाठी मोठी तयारी करण्यात येत आहे. उद्या देखील पुण्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुण्याला रेड अलर्ट, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता
आज बुधवारी राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर आज (दि. २५) पुण्यासह घाटमाथ्यावर आणि संपूर्ण जिल्ह्याला 'रेड अलर्ट' दिला आहे. त्यामुळे पुणे शहरातही सावधानतेचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे. शहरात 60 ते 100 मिमीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच, 26 व 27 रोजी शहरात 'यलो अलर्ट' म्हणजे 20 ते 30 मिमी पावसाचा अंदाज आहे. त्यानंतर मात्र पावसाचा जोर कमी होणार आहे.
आगामी तीन-चार दिवस महाराष्ट्रात आणि पुण्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली आहे. या क्षेत्राच्या प्रभावामुळे राज्यात 28 सप्टेंबरपर्यंत पावसाचा अंदाज आहे, अशी माहिती ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिली आहे.
स्वारगेट भुयारी मेट्रो मार्ग पुणेकरांसाठी होणार खुला; मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते उद्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हा पुणे शहरातील पहिला भूमिगत मेट्रो मार्गाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमानंतर हा मार्ग सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात येणार आहे. उद्या (गुरूवारी) रात्री ८.३० नंतर पुणेकरांना शहरातील पहिला भूमिगत मेट्रोचा मार्ग अनुभवता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण कार्यक्रमानंतर हा मार्ग खुला करण्यात येणार आहे. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हे 3.62 किलोमीटरचे अंतर आहे. मात्र, दुपारच्या वेळेत जिल्हा न्यायालय मेट्रो स्टेशन नागरिकांसाठी बंद राहणार आहे.