पुणे : विरोधक सातत्याने माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात असलेल्या कर्मयोगी आणि  निरा-भिमा सहकारी साखर कारखान्याच्या ऊस बिलाचा प्रश्न उपस्थित करत होते. त्यांना हर्षवर्धन पाटील यांनी उत्तर दिलेलं आहे. हेच विरोधक आपल्या आमदारकीचा मार्ग मोकळा करण्यासाठी कारखान्याला जाणीवपूर्वक अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत होते, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे. इंदापूरचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सातत्याने हर्षवर्धन हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात असलेल्या कारखान्यावरती बिल थकवल्याचा आरोप करत होते. त्यावर ती आता हर्षवर्धन पाटील यांनी उत्तर दिले. आपल्या आमदारकीचा मार्ग रिकामा व्हावा मोकळा व्हावा यासाठी सातत्याने कारखाना अडचणीत आणण्याचा प्रयत्न काही जण करत होते, नाव न घेता विरोधकांना पाटलांनी चांगलंच सुनावलं आहे. 


शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पांडुरंग रायते यांनी दोन दिवसांपूर्वी हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यातील कारखान्याने शेतकऱ्यांची ऊस दरात फसवणूक केल्याचा आरोप केला होता. त्यावरदेखील हर्षवर्धन पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  ते म्हणाले की, आमच्या कारखान्यावर पांडुरंग रायते यांनी केलेले आरोप हे चुकीचे आहेत. आम्ही कुणाची फसवणूक केलेली नाही. सहकारी कारखान्यांना अनेक गोष्टी सांभाळून कारखाना चालवावा लागतो.


सरकारने विलंब न करता मराठ्यांना आरक्षण द्यावे....


आजपर्यंत मराठा समाजाने सर्व लोकांना आरक्षण दिलं. आता मराठ्यांना आरक्षण देण्याची वेळ आलेली आहे. सरकारने विलंब न करता मराठ्यांना आरक्षण द्यावे. सरकार आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक आहे, असं मत त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात व्यक्त केलं आहे. 


शेतकरी सभासदांना ऊस दरात फटका का बसतो?


मला पण वाटतं ऊसाला 3400 दर द्यावा परंतु हा दर मी देऊ शकत नाही. कारण कमी रिकव्हरचा ऊस देखील कारखान्याला घ्यावा लागतो. एखाद्या ठिकाणी ऊस जळाला तर खाजगी कारखाने नेत नाहीत. परंतु सहकारी कारखान्याला तो उस न्यावा लागतो. सहकारी कारखान्याला कार्यक्षेत्रातील सगळा ऊस हा न्यावा लागतो. पण खाजगी कारखाने फक्त कार्यक्षेत्रातील चांगला ऊस घेतात आणि खराब सहकारी कारखान्यांना गाळावा लागतो. त्यामुळे शेतकरी सभासदांना दरात फटका बसतो, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. 


विरोधकांवर निशाणा... तर आमदारकीचा मार्ग मोकळा!


आम्ही आधीच तेवीसशे रुपये दर देण्याचा स्पष्ट केलं होतं त्यात अजून दोनशे रुपये वाढवून देत आहोत. मधल्या काळात ऊसाची बिल थकली कारण काही लोकांनी जाणीवपूर्वक अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. जर यांना अडचणीत आणलं तर आपला आमदारकीचा मार्ग मोकळा होईल, अशी काही लोकांची धारणा होती, असंही ते म्हणाले. 


अमित शाहांमुळे साखर कारखानदारी फायद्यात...


खाजगी कारखाने चांगले चालत आहेत सहकारी मात्र अडचणीत आहेत त्याचं कारण सहकारी कारखाने चालवताना अनेक गोष्टींना सामोरे जावं लागतं आणि गोष्टींची काळजी घ्यावी लागते, काही लोक जाणीवपूर्वक कारखाना अडचणीत यावा यासाठी प्रयत्न करतात. परंतु आता सगळ्या अडचणी दूर झाल्या आहेत पुढच्या वर्षी अशी वेळ सभासदांवर येणार नाही. अमित शाहा यांनी धोरणात अनेक चांगले बदल केले त्यामुळे साखर कारखानदारी फायद्यात आली. कारखान्यावरील टॅक्स असो मोलायसिसवरील टॅक्स असो सरकारने कमी केले, असं म्हणत त्यांनी सरकारच्या कामाचं कौतुक केलं. 


अनेक कारखाने आपली क्रशिंग कॅपॅसिटी वाढवत आहेत त्यामुळे आगामी काळात साखर कारखानदारी अडचणीत येऊ शकते. प्रत्येकानेच क्रशिंग कॅपॅसिटी वाढवली तर ऊस उपलब्ध होणार नाही. आधी 200 दिवस गळीत हंगाम चालत होता आता तो 90 ते 100 दिवसावरती आलेला आहे.  जर साखर कारखान्याबाबत धोरणं बदलली नाहीत आणि बंधने घातली नाहीत तर साखर कारखानदारी अडचण येईल. साखरेची विक्री किंमत 3100 वरून 3600 वर  रुपये करावी अशी मागणी आम्ही करत आहोत. तसेच इथेनॉल सात ते आठ रुपयांनी वाढवावं अशी देखील मागणी आम्ही करतो आहोत. एक व्यवसाय म्हणून कारखानदारीकडे बघितलं पाहिजे. वेळीच कारखान्यातील धोरणे बदलली नाहीत तर साखर कारखानदारी आगामी काळात अडचणीत येईल, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. 


वरिष्ठ म्हणाले भाजपच्या नेत्यांवर अन्याय होणार नाही!


जेव्हा अजित पवार सत्तेत आले त्यावेळी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी हे ठरवून दिले आहे की जे भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावरती कोणताही अन्याय होणार नाही. अनेक जण मला विचारतात मंत्री 19 वर्षात आम्ही काय केलं तर त्यांना मी सांगू इच्छितो एका रात्रीत बदल होत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.



विकासावरुन विरोधकांकडे बोट 


वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून इंदापूर तालुका आम्ही समृद्ध केला अनेकांना रोजगार दिला. तालुक्यात मोठ्या प्रमाणात रस्ते करणे  मला जमलं नाही. ते आत्ताच्या लोकप्रतिनिधींनी केलं परंतु काय दर्जाचे रस्ते झालेत ते 2024 साली आम्ही त्याच रस्त्यावरून प्रचार करू आणि मग तुम्हाला कळेल की नेमका विकास कसा विकास झाला, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे .


इतर महत्वाची बातमी-


Pune Viral News : पुणेकर पठ्ठ्याची ट्रॅफिक हॅक व्हायरल, लढवलेली शक्कल पाहून नेटकऱ्यांनी ठेवला थेट डोक्यावर हात, नक्की असं काय केलं?