पुणे : येत्या काळात पुणेकरांना मोठ्या पाणी टंचाईला सामोरं जाण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील हॉटेल व्यावसायिकांनी ग्राहकांना फक्त अर्धा ग्लास पाणी देण्याची योजना सुरु केली आहे. यामुळे पाण्याचा होणार अपव्यव टाळला जाणार आहे, असं हॉटेल चालकांचं मत आहे.


हॉटेलमध्ये पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. हॉटेलमध्ये ग्राहक आल्यावर पहिल्यांदा त्याला पाणी दिले जाते. मात्र, अनेक जण ग्लासमधील अर्धच पाणी पितात आणि उरलेले पाणी वाया जातं. हीच बाब लक्षात घेऊन पुण्यातील काही हॉटेल्सनी ग्राहकांना अर्धा ग्लास पाणी देण्याचा किंवा मागितलं तरच पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे.


सामन्य पुणेकरांनीही हॉटेल व्यावसायिकांच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. पुण्यातील धरणांतील आटलेला पाणीसाठा आणि मुठा धरणाच्या बंधाऱ्यांला पडलेल्या भगदाडानंतर पुण्याला येत्या काळात पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे. पुणे शहराला खडकवासला धरणसमुहातून दररोज 1300 एमएलडी पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र दररोज एवढं पाणी घेतल्यास धरणातील हा साठा येत्या काही महिन्यांतच संपण्याची भीती आहे.


पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुणेकरांनी पाणी काटकसरीने वापरण्याचं आवाहन केलं होतं. पाणी काटकसरीने न वापरल्यास एप्रिल, मे आणि जून महिन्यात धरणात पाण्याचा थेंब देखील शिल्लक राहणार नाही. पुण्यात पाणीकपात अटळ असल्याचेही गिरीश बापट यांनी स्पष्ट केलं होतं. पाण्याचं योग्य नियोजन न केल्यास एप्रिल, मे आणि जूनमध्ये एक दिवसआड पाणी देण्याची वेळ पुण्यावर येऊ शकते, असंही बापट म्हणाले.