पुणे : ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांनी आता सत्तेचा गैरवापर करण्यास सुरुवात केली आहे. देशातील सर्वोच्च तपास यंत्रणेला वेठीस धरलं जात आहे. हे चित्र देशाच्या दृष्टीने घातक आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. तसंच लोकांचे प्रश्न न सोडवणाऱ्या सरकारकडून आम्ही लोकशाही मार्गाने सत्ता हिसकावून घेऊ, असा विश्वासही शरद पवारांनी व्यक्त केला.


राष्ट्रवादी काँग्रेसने आज पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच इथे संविधान बचाओ रॅलीचं आयोजन केलं. या रॅलीत अध्यक्ष शरद पवार यांच्यासह पक्षाचे सर्व प्रमुख नेते सहभागी झाले होते. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांमधून संविधानाचे महत्त्व सादर केलं. त्यानंतर या नेत्यांकडून मनुस्मृतीचं दहन करण्यात आलं.

सीबीआय वाद
सध्या देशभरात गाजत असलेल्या सीबीआय वादावर शरद पवार म्हणाले की, "सीबीआयमध्ये जे काही झालं, अधिकाऱ्यांच्या ज्या पद्धतीने बदल्या झाल्या, नियुक्त्या झाल्या यावरुन सरकारचा प्रशासनाला हाच इशारा दिला की आम्ही म्हणू तीच पूर्वदिशा."

शबरीमला मंदिर प्रवेश वाद
"शबरीमला मंदिरात 10 ते 50 वयोगटातील महिलांना प्रवेश देण्यात यावा," असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. मात्र "ज्याची अंमलबजावणीच होऊ शकत नाही, असा निर्णय न्यायालय कसा देऊ शकतं," असा प्रश्न भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी उपस्थित केला होता. याविषयी शरद पवार म्हणाले की, "सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करताना केरळ सरकारनेही कोर्टाचा आदर करायचं ठरवलं. मात्र भाजपचे अध्यक्ष तिथे गेले आणि विरोधात बोलले. यावरुन त्यांना न्यायालय, संविधान, स्त्री-पुरुष समानता मान्य नाही हेच दिसतं."

...तरीही सरकार निर्णय घ्यायला तयार नाही
राज्यातील दुष्काळाच्या परिस्थितीवरही शरद पवारांनी सरकारने हल्लाबोल केला. "दुष्काळाच्या झळा सर्वांनाच बसत आहेत. पिण्याच्या पाण्याची समस्या तीव्र आहे. पण सगळ्यात जास्त त्रास महिलांना होत आहे. शेकडो भगिनी पाण्यासाठी कष्ट करतात आहेत. मात्र सरकार निर्णय घेण्यास तयार नाही‌. आघाडी सरकार असताना दुष्काळात चारा छावण्या सुरु केल्या. मात्र आताच सरकार म्हणतंय की आम्ही चारा तयार करु आणि तो घरोघर पोहोचवू," असं पवार म्हणाले.