पुणे : निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये जणू गुंडांना प्रवेश देण्याची चढाओढच सुरु झाल्याचं दिसत आहे. पुण्यातल्या मुळशी तालुक्यात झालेल्या एका कार्यक्रमात हत्या, खंडणी, अपहरण असे अनेक गंभीर गुन्हे असणाऱ्या विठ्ठल शेलारला पक्षात प्रवेश देण्यात आला.
विठ्ठल शेलारच्या भाजपप्रवेशाला पालकमंत्री गिरीश बापटही उपस्थित होते. केवळ पक्षप्रवेशच नाही, तर त्याला भोर-वेल्हा-मुळशी या भागातील युवा मोर्चाचं अध्यक्षपदही बहाल करण्यात आलं.
मुळशीतील गुंड विठ्ठल शेलार याच्या टोळीविरोधात ग्रामीण पोलिसांनी मोक्का अंतर्गत 2014 मध्ये कारवाई केली होती. चार महिन्यांपूर्वी त्याला हायकोर्टाने जामीन मंजूर केला. मुळशी तालुक्यात दहशत असलेल्या आणि जामिनावर सुटलेल्या शेलारने 30 डिसेंबरला पालकमंत्री गिरीश बापट, आमदार बाळा भेगडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
मान्यवरांसोबत काढलेले फोटोही शेलारने फेसबुकवरही टाकले आहेत. शेलारला पक्षप्रवेश दिल्याने मुळशी तालुक्यात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मुळशी तालुक्यात शेलारची मोठी दहशत आहे.
विठ्ठल शेलारचे गुन्हे
2009 मध्ये डेक्कन भागात दरोड्याची तयारी
2010 मध्ये टोळीयुद्धातून पिंटू मारणेची हत्या
2012 मध्ये प्रतिस्पर्धी टोळीतील दोघांचे अपहरण, हत्या, मृतदेह जाळून टाकले
2014 मध्ये मुळशीत एकाचं खंडणीसाठी अपहरण