पुणे : गोंदिया जिल्ह्यात मोबाईल अपघाताची मोठी दुर्घटना घडली. त्यामध्ये, महिन्याभरापूर्वीच खरेदी केलेल्या मोबाईलने (Mobile) शिक्षकाचा जीव घेतल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. चक्क  खिशात ठेवलेल्या मोबाईलचा ब्लास्ट (Blast) झाल्याने शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे मोबाईल वापरणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात एबीपी माझाने टेक्निकल एक्स्पर्टशी संवाद साधून या ब्लास्टमागील कारण जाणून घेतले. तसेच, यासाठी काय काळजी घ्यायची हेही त्यांनी सांगितले.


पुण्यातील टेकनॉलॉजी एक्सपर्ट अतुल कहाते यांनी घडलेल्या घटनेबाबत बोलताना म्हटले की, मोबाईल मध्ये स्फोट होण्याच्या घटना नव्या नाहीत. मात्र, घाबरून जाण्याचं कोणतही कारण नाही. दुय्यम दर्जाच्या कंपनीचा मोबाईल घेतला असेल आणि त्यात डुप्लिकेट बॅटरी टाकली असेल तर मोबाईलचा स्फोट होऊ शकतो. तसेच, चार्जर देखील दुय्यम दर्जाचा असला तर मोबाईलचा स्फोट होऊ शकतो, असे कहाते यांनी सांगितले. त्यामुळे, इतर मोबाईल युजर्सने घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र, चांगल्या कंपनीचाच मोबाईल घेणे कधीही चांगले हेच या घटनेवरून दिसून येईल. तसेच, मोबाईलमध्ये बॅटरी बदलताना संबंधित कंपनीची व उत्कृष्ट दर्जाचीच घ्यायला हवी, असा सल्लाही कहाते यांनी दिला आहे. 


गोंदियातील घटनेत नेमकं काय घडलं?


खिशात ठेवलेल्या मोबाईलचा अचानक स्फोट झाल्यानं त्यात गंभीर जखमी होऊन एका मुख्याध्यापकाचा मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत असलेला नातेवाईक गंभीर जखमी झाल्याची घटना गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सिरेगावबांध इथं शुक्रवारी रात्री घडली. सुरेश संग्रामे (55) असं मृतक शिक्षकाचं नाव आहे. तर नत्थु गायकवाड (56) असं गंभीर जखमी असलेल्या इसमाचं नाव आहे. 


मृतक सुरेश संग्राम हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापक होते. ते आपल्या स्वगावी साकोली तालुक्यातील सिरेगावटोला इथे आले होते. दरम्यान, सुरेश संग्रामे आणि त्यांचे नातेवाईक नत्थु गायकवाड हे दोघेही नातेवाईकाच्या कार्यक्रमासाठी अर्जुनी मोरगावकडं निघाले असताना सुरेश यांच्या शर्टच्या खिशात ठेवलेल्या मोबाईलचा अचानक स्फोट झाला, यात सुरेश संग्राम यांचा मृत्यू झाला. तर नत्थु गायकवाड हे जखमी झाल्याने त्यांच्यावर सध्या भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. महिन्याभरापूर्वीच शिक्षकाने हा मोबाईल खरेदी केल्याची माहिती आहे. या मोबाईलची मॅन्युफॅक्चरिंग हे 2024 जुलै महिन्यातली आहे.


हेही वाचा


ब्रँडेड पेंटच्या नावाखाली गोवामेड दारुची तस्करी, 600 बॉक्स व्हिस्की, 110 बॉक्स बिअर जप्त