सुट्ट्यांच्या काळात मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर 'गोल्डन अवर्स'!
एबीपी माझा वेब टीम | 10 Sep 2016 12:58 PM (IST)
रायगडः मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीची समस्या टाळण्यासाठी पोलिसांनी नवी कल्पना आणली आहे. सुट्ट्या आणि वीकेंडला एक्स्प्रेस वेवर 'गोल्डन अवर्स' लागू करण्यात येणार आहे. यामध्ये अवजड वाहनांना वाहतुकीसाठी बंदी असणार आहे. या नियमाची महामार्ग पोलिसांनी आजपासूनच अंमलबजावणी सुरु केली आहे. एक्स्प्रेस वेवरील अवजड वाहनांची वाहतूक आज जवळपास 5-6 तासांसाठी थांबवण्यात आली होती. यामुळे वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी फायदा झाला असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. अतिरिक्त महामार्ग पोलिस संचालक आर. के. पद्मनाभन यांनी एक्स्प्रेस वेला आज भेट दिली. सुट्ट्यांच्या काळात आणि वीकेंडला एक्स्प्रेस वेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. परिणामी अपघातासारख्या दुर्घटनाही वाहतूक कोंडीमुळे पाहायला मिळतात. यावर पोलिसांनी गोल्डन अवर्सची शक्कल लढवली आहे.