पुणे : पुण्याच्या दौंड तालुक्यातील राहू गावात पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर शनिवारी मध्यरात्री दरोडा पडला आहे. दरोडेखोरांनी बँकेची तिजोरी फोडून 50 ते 60 लाख रुपयांची रोख रक्कम पळवून सुरक्षरक्षकालाही मारहाण केली.
बँकेच्या मागील बाजूच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी बँकेत प्रवेश केला. यावेळी दरोडेखोरांनी सुरक्षारक्षकाला बांधून मारहाण केली.
महत्त्वाचं म्हणजे चोरीआधी सीसीटीव्हीचे कॅमेरेही चोरट्यांनी दुसरीकडे वळवले. एवढंच नाही तर सीसीटीव्ही फुटेजची हार्डडिस्कही काढून घेतली.
या बँकेच्या राहू शाखेवर यापूर्वीही दोन वेळा दरोड्याचा प्रयत्न झाला होता. मात्र तिजोरीपर्यत पोहोचण्यात चोरटे अपयशी ठरले होते. पण यावेळी त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला आणि 50-60 लाखांची रोकड लुटली.
दरम्यान, जिल्हा ग्रामीण पोलिस अधिक्षक डॉ. जय पवार, अप्पर पोलिस अधिक्षक तानाजी चिखले, उपविभागीय अधिकारी राजेंद्र मोरे यांनी घटनास्थळी जाऊन चौकशी सुरु केली आहे.