Pune Goat News: पुण्यात कधी काय होईल याचा काही नेम नाही. बकरी दारात बांधली आणि तिच्या आवाजाचा त्रास होत आहे. या कारणावरुन बकरी मालकाने मारहाण केली आहे. हा वाद थेट खडकी पोलिस ठाण्यात गेला आहे. तक्रारदार आणि अल्पवयीन मुलामध्ये वाद झाला हा वाद टोकाला गेला. त्यानंतर त्याने थेट पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. तक्रारदार आणि अल्पवयीन मुलगा खडकी परिसरात एकमेकांच्या शेजारी राहतात. या प्रकरणी  संबधीत अल्पवयीन मुलाविरूध्द अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.


याबाबत एका शिवाजीनगर येथील महात्मा गांधी वसाहतीत राहणार्‍या एका 35 वर्षीय युवकाने खडकी पोलिस ठाण्यात एका अल्पवयीन मुला विरूध्द तक्रार दिली आहे. अल्पवयीन मुलगा तक्रारदाराच्या घराच्या समोर बकरी बांधत होता. या बकरीचा आणि तिच्या आवाजाचा त्रास व्हायचा. त्यामुळे तक्रारदाराने अल्पवयीन मुलाला बकरी घरापुढे का बांधली असा जाब विचारला. यातून दोघांमध्ये चांगलीच वादावादी झाली. त्यानंतर दोघांमध्ये मारहाण देखील झाली. मारहाणीनंतर त्या व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी दिली. हा सगळा प्रकार अति वाढत गेल्याने युवकाने थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ठाण्यात बोलवले त्यांची समजूत काढली. बकरीमुळे कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्यायला सांगितली. या घडलेल्या प्रकरामुळे पुणेकरांवर चक्क डोक्यावर हात ठेवायची वेळ आली आहे. 



पोपट मालकावर गुन्हा दाखल
पुण्यात पोपट वारंवार शिट्टी मारत असल्याने पोपटाच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय पोपटाचा त्रास होत असल्याची तक्रार शेजाऱ्यांनी केली होती.  या तक्रारीनंतर पुण्याच्या खडकी पोलीस ठाण्यात पोपटाच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अकबर अमजद खान असं गुन्हा दाखल झालेल्या पोपटाच्या मालकाचं नाव होतं.  सुरेश अंकुश शिंदे (वय 72) यांनी या बद्दल पोलिसात तक्रार दिली होती. अकबर अमजद खान यांच्यावर पुण्यातील खडकी पोलिस ठाण्यात भादवि. 504, 506 प्रमाणे अदखलपात्र गुन्हा दाखल झाला होता.शिंदे आणि खान हे दोघे ही हे महात्मा गांधी वसाहत, तुळशी मार्केट शेजारी, शिवाजीनगर, शेजारी राहायला आहेत.  अकबर अमजद खान यांनी एक पोपट पाळला आहे. हा पोपट वारंवार  शिट्या मारत होता. त्यामुळे आता पुणेकरांनी प्राण्यावर सूड उगवायचा निर्णय घेतला की काय?, असा प्रश्न निर्माण होत आहे.