Girish Bapat death : पुण्याचे भाजप (BJP) खासदार गिरीश बापट यांचं दीर्घ आजाराने निधन (Girish bapat death) आज निधन झालं आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांनी आज वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या जाण्यानं राजकीय क्षेत्रात पोकळी निर्माण झाल्याच्या भावना राजकीय नेत्यांनी व्यक्त केल्या आहेत.
गिरीश बापटांनी नेहमीच सर्वसमावेशक भूमिका घेतली, निधनाचे वृत्त दुःखद : शरद पवार
पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. चार दशकांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत गिरीश बापट यांनी नेहमीच सर्वसमावेशक भूमिका घेत राजकीय प्रवास केला.
सुसंस्कृत लोकप्रतिनिधी म्हणून गिरीषजी कायम स्मरणात राहतील : नितीन गडकरी
गिरीषजी बापट यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दु:ख झाले. जनसंघाच्या काळापासून पुणे शहरात गेली पाच दशके सक्रिय राजकारणात असणारे, पूर्वीपासून विधिमंडळात व आता लोकसभेतील माझे जीवलग सहकारी, पुण्यामध्ये भाजपच्या जडणघडणीतील एक प्रमुख व क्रियाशील नेतृत्व होते अशा शब्दात मंत्री नितीन गडकरी यांनी गिरीष बापट यांना श्रद्धांजली अर्पण केली.
राजकीयदृष्ट्या भाजपला अतिशय प्रतिकूल काळ असताना पुण्यात भाजपला वाढवण्यात, मजबूत करण्यात गिरीषजींचे मोठे योगदान राहिले आहे. एक मृदुभाषी, संवेदनशील आणि लोकांसाठी झटणारा सुसंस्कृत लोकप्रतिनिधी म्हणून गिरीषजी कायम स्मरणात राहतील. महाराष्ट्रात विधिमंडळात अनेक वर्षे आम्ही सोबत काम केले. ते माझे अत्यंत जवळचे आणि कौटुंबिक मित्र होते. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली ही पोकळी कधीही न भरुन येणारी आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या कठीण काळात सावरण्याची शक्ती देवो. ॐ शांती.
गिरीश बापट यांच्या जाण्यानं पुणे पोरकं झालं : चंद्रकांत पाटील
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पक्षनिष्ठ व्यक्तिमत्त्व खासदार आदरणीय गिरीशजी बापट यांचं निधन अतिशय दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने पुणे आज पोरकं झालं असल्याची भावना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. खासदार गिरीश बापट यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि अनुभवी व्यक्तिमत्त्वाच्या जाण्याने पक्षाचा आधारवड हरपला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, नगरसेवक, आमदार, खासदार आणि राज्याचे मंत्री अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी उत्तमरित्या पार पाडल्या. बापट साहेबांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने 'पुण्याची ताकद गिरीश बापट' ही ओळख जनमानसात तयार केली होती. आज बापट साहेबांच्या जाण्याने पुणे पोरकं झालं आहे. बापट साहेबांच्या जाण्याने आमचा मार्गदर्शक हरपला आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
गिरीश बापट हे विकासाची दृष्टी असलेला नेता : मोहन जोशी
एक कार्यकर्ता कसा असावा याचे उदाहरण म्हणजे गिरीश बापट. गिरीश बापट हे विकासाची दृष्टी असलेला नेता होता अशी भावना काँग्रेस नेते मोहन जोशी यांनी व्यक्त केली. आमचे पक्ष वेगळे असले तरी माझे त्यांच्याशी मैत्री कायम होता. निवडणुका संपल्या की पुण्याच्या विकासासाठी आम्ही एकत्र येत होते, असेही मोहन जोशी म्हणाले.
गिरीश बापट यांच्या जाण्यानं मोठी पोकळी : अंकुश काकडे
गिरीश बापट यांच्या जाण्यानं पुण्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पुण्याच्या विकासत त्यांचं मोठं योगदान होतं. त्यांचे योगदान आम्ही कधीही विसरु शकणार नाही अशी भावना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अंकुश काकडे यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या आठवणी सांगताना अंकुश काकडे यांना अश्रू अनावर झाले. गिरीश बापट आणि माझे 40 वर्षाहून अधिक काळ झालं मैत्रीचे नाते होते.
गिरीश बापट यांच्या जाण्यानं पक्षाचं मोठं नुकसान: विनोद तावडे
सामान्य माणसांशी कनेक्ट असणारे नेते. लोकांच्या अडचणी समजून घेऊन सोडवणारे नेते म्हणून गिरीश बापट यांची ओळख होती. पुणे आणि बापट यांचं एक वेगळं नातं होतं. त्यांच्या जाण्यानं पक्षाचं मोठं नुकसान झाल्याची भावना भाजपचे नेते विनोद तावडे यांनी व्यक्त केली.
नमिळाऊ स्वभावाचे नेतृत्व काळाच्या पडद्याआड : सुप्रिया सुळे
माझे लोकसभेतील सहकारी आणि पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले. ही बातमी अतिशय दुःखद आहे. सलग पाच वेळा पुण्यातून ते आमदार म्हणून विधानसभेत निवडून गेले. त्यांना काही काळ राज्य मंत्रिमंडळातही काम करण्याची संधी लाभली होती. त्यांच्या निधनामुळे एक मनमिळाऊ स्वभावाचे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केल्या.
महत्त्वाच्या बातम्या: