पुणे : पुण्यातील गुंड गजानन मारणे हा अटकेच्या भीतीने फरार झाल्याचं पुणे पोलिसांकडून सांगण्यात आलंय. एक प्रसिद्धीपत्रक काढुन पुणे पोलिसांनी याची माहिती दिलीय. सोमवारी तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर गजानन मारणेची त्याच्या समर्थकांनी तळोजा ते पुणे अशी जंगी मिरवणूक काढली होती. शेकडो वाहनांचा ताफा या मिरवणुकीत सहभागी झाला होता.


हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुंडाची अशी राजरोसपणे मिरवणूक निघाल्याने पोलिस काय करतायत असा प्रश्न विचारला जाऊ लागला होता. त्यानंतर पोलिसांनी गजानन मारणे आणि त्याच्या समर्थकांविरुद्ध वेगवेगळ्या पोलिस स्टेशनमधे गुन्हे नोंद करण्याच सत्र सुरू केलं. कोथरुड पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात गजानन मारणे आणि त्याच्या साथीदारांना अटक देखील करण्यात आली होती. मात्र, दुसऱ्याच दिवशी त्याची न्यायालयाकडून जामिनावर सुटका करण्यात आली. त्यानंतर गजानन मारणेला नोटीस पाठवून इतर पोलिस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आलेल्या गुन्ह्यांच्या तपासासाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं. मात्र, जामिनावर सुटताच गजानन मारणे पुन्हा फरार झाल्याचं आणि त्याच्या शोधासाठी गुन्हे शाखेची अनेक पथकं तैनात करण्यात आल्याचं पुणे पोलिसांकडून सांगण्यात आलंय. गजानन मारणेवर तळेगाव, हिंजवडी, वारजे, कोथरुड अशा वेगवेगळ्या पोलिस स्टेशनमधे गुन्हे नोंद करण्यात आलेत.


कोण आहे गजानन मारणे?
मागील अनेक दशकांपासून गजानन मारणे हे नाव पुण्यातील गुन्हेगारी विश्वाच्या केंद्रस्थानी आहे. हत्या, हत्येचा प्रयत्न, अपहरण, खंडणी, बेकायदा शस्त्रं बाळगणं असं अनेक गुन्हे मारणेवर नोंद आहेत. 2014 साली विरोधी टोळीतील पप्पू गावडे आणि अमोल बधे यांच्या हत्येच्या आरोपाखाली मारणेला त्याच्या साथीदारांसह अटक करण्यात आली होती. त्यातील अमोल बधेचा खून तर पुण्यातील नवी पेठेत पाठलाग करून धारदार शस्त्रांच्या साहाय्याने करण्यात आला होता. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या या थरारक घटनेने पुण्यात खळबळ उडाली होती.


गजानन मारणेच्या स्वागतासाठी जमलेल्या त्याच्या समर्थकांमध्ये तरुणाईत नुकत्याच प्रवेश केलेल्या युवकांचं प्रमाण अधिक आहे. गुन्हेगार आणि गुन्हेगारीचं अशाप्रकारे होणारं उदात्तीकरण या तरुणांची पावलं गुन्हेगारी विश्वाकडं वळण्यास कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे या उद्दात्तीकरणाला जर वेळीच आळा घातला नाही, तर त्यातून असे अनेक गजानन मारणे निर्माण होण्याची भिती आहे. आणि तसं झाल्यास त्याला जबाबदार पोलिसच असणार आहेत.


Gajanan Marne | गुंड गजानन मारणेवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु