पुणे : पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत ( Visarjan 2022) मानाच्या पाच गणपतींच्या अगोदर आपल्याला मिरवणूक काढू द्यावी यासाठी पुण्यातील काही गणेश मंडळामार्फत उच्च न्यायालयात याचिका (Bombay High Court) दाखल करण्यात आली आहे.  पुण्यातील मानाचे समजले जाणारे पाच गणपती मंडळ म्हणजे श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालीम गणपती, तुळशीबाग गणपती, केसरीवाडा गणपती या सर्व मंडळांना याचिकेतून प्रतिवादी करण्यात आले आहे. 


विसर्जन मिरवणुकांच्या वेळी पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरून प्रथम मानाचे पाच गणपती मंडळच जातील. त्यानंतरच इतरांनी जावे हा रूढी-परंपरा व प्रथेचा भाग म्हणजे कायदा नाही व त्यामुळे इतर लहान गणपती मंडळांना विसर्जनासाठी लक्ष्मी रस्ता वापरण्यावर असणारी बंधने म्हणजे बेकायदेशीरता आणि संचार स्वातंत्र्याचे उल्लंघन आहे असा आरोप करणारी याचिका बढाई समाज ट्रस्टचे अध्यक्ष शैलेश बढाई यांनी अ‍ॅड. असीम सरोदे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.


गणपती उत्सव लवकरच सुरु होणार आहे आणि अशातच पुण्यातील गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीच्या वेळी उफाळून येणारा भेदभावाचा व पोलिसी निर्णयातील विषमतेचा मुद्दा थेट उच्च न्यायालयात पोहोचला आहे. पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकांमध्ये शहरातील मानाच्या गणपती मंडळांनाच प्रशासन प्राधान्य देते. दरवर्षी विनंत्या करूनही पोलीस ऐकून घेत नाहीत तर पहिल्या पाच मानाच्या गणपती मंडळांच्याद्वारे इतर मंडळांना तुच्छतेची वागणूक देण्यात येते अशी व्यथा याचिकेतून मांडल्याचे याचिकाकर्ते शैलेश बढाई यांनी म्हटलय. आपल्याला अनेक लहान लहान गणपती मंडळांचा पाठींबा असल्याचा दावा सुद्धा त्यांनी केलाय. पुण्यातील मानाचे समजले जाणारे पाच गणपती मंडळ म्हणजे श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालीम गणपती, तुळशीबाग गणपती, केसरीवाडा गणपती या सर्व मंडळांना याचिकेतून प्रतिवादी करण्यात आलय.


राज्यभरात यंदा दोन वर्षांनी गणेशोत्सव जल्लोषात साजरा केला जाणार आहे. त्यासाठी पुणे पोलिसांकडून देखील जय्यत तयारी सुरु आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नियम आणि नियोजन सांगितले आहे. पुणे पोलिस आगामी गणेशोत्सवासाठी सज्ज आहे.  3600 सार्वजनिक मंडळ पुण्यात आहेत. गणपती पाहण्यासाठी अनेक नागरीक पुण्यात दाखल होतात. प्रत्येक गणपतीजवळ मोठी गर्दी असते. त्यादृष्टीने गर्दीचे नियोजन तसेच ट्रॅफिकचे नियोजन देखील केलेले आहे. 7500 हजार पोलिस रस्त्यावर गणेशोत्सवात सज्ज आहेत.