Dehu Vishal More : पुण्यातील (Pune) देहू संस्थानचे (Dehu) जुगारी (Gambling) विश्वस्त विशाल मोरे (Vishal more) यांची अखेर हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागेसाठी आता निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे. यात नाना मोरेंचा एकमेव अर्ज राहिलेला आहे. त्यामुळे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या संस्थानावर त्यांची बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे. 16 ऑक्टोबरला याची औपचारिक घोषणा होणं बाकी आहे.
विशाल मोरेना तीन पत्त्यांचा जुगार खेळताना रंगेहाथ अटक करण्यात आली होती. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या संस्थानचे ते विश्वस्त असल्याने वारकरी संप्रदायात मोठी नाराजी पसरली होती. त्यामुळेच संस्थानने जुगारी विश्वस्त विशाल मोरेंची हकालपट्टी केली. आता त्यांच्या जागी नाना मोरेंची वर्णी लागणार आहे.
वारकरी संप्रदायात खळबळ
पुण्याच्या चाकण MIDC हद्दीत जुगार खेळताना देहू संस्थानच्या विश्वस्तास रंगेहाथ अटक झाल्यानंतर त्याच विश्वस्तावर देहू संस्थान हकालपट्टी करण्याच्या तयारीत होती. अटकेतील विश्वस्त विशाल मोरेंना संस्थान बाजू मांडण्याची संधी देणार दिली होती. विशाल मोरे यांनी त्या संदर्भात खुलासा केला आणि ते दोषी नाहीत हे सिद्ध झालं नाही तर संस्थानच्या नियमानुसार त्यांची विश्वस्त पदावरुन हकालपट्टी करण्यात येईल, अस संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी स्पष्ट केलं होतं. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तीन पत्ती जुगार अड्ड्यावर छापा टाकल्यावर पर्दाफाश झाला आणि राजकीय वर्तुळासह वारकरी संप्रदायात एकच खळबळ उडाली होती. म्हणूनच संत तुकाराम महाराज संस्थान विश्वस्त विशाल मोरे यांच्याबद्दल कठोर पाऊल उचललं आहे.
काय होतं प्रकरण?
3 ऑगस्टला पुण्यातील चाकण एमआयडीसी हद्दीत जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती दरोडा विरोधी पथकाला मिळाली होती. देहूगाव ते येलवाडी मार्गावरील एक बंदावस्थेत कंपनी आहे. त्या कंपनीच्या पहिल्या मजल्यावर हा पत्त्यांचा खेळ रंगला होता. पिंपरी चिंचवड पोलिसांनी याची खातरजाम केली आणि त्यानुसार मंगळवारच्या रात्री सापळा रचला. एका मागोमाग एक असे 26 जण कंपनीत दाखल झाले. सर्वांच्या हातात पत्ते पडू लागले, नोटांची बंडलं खुलू लागली, डाव मारणारे आनंदी तर पैसा डुबणारे नाराजीत होते. तितक्यात पोलिसांनी तिथं छापा टाकला आणि सर्वानाच धक्का बसला. पोलिसांनी सर्वांची माहिती घ्यायला सुरुवात केली. तेव्हा पोलिसांना ही धक्का बसला. कारण या 26 जणांमध्ये देहूच्या संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त विशाल केशव मोरे, माजी विश्वस्त संतोष गुलाब मोरे ही जुगार खेळताना दिसले होते.