Pimpari Chinchwad Police Drone Updates: नदीकाठी अथवा झोपडपट्ट्यांमधील अवैध धंद्यांवर टाच आणण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीसाकडून ड्रोनचा वापर केला जातोय. राज्यातील हा पहिलाच प्रयोग असल्याचा दावा केला जातोय. या ड्रोन स्ट्राईकमुळे आता अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. आळंदी पोलीस ठाणे हद्दीतील कोयाळी गावात याच ड्रोनच्या सहाय्याने कारवाई करण्यात आली. झाडाझुडुपांमध्ये भीमा नदीकाठी असलेल्या गावठी हातभट्टीवर छापा टाकला आणि अंदाजे दहा लाख रूपये किंमतीचे 20 हजार लिटर कच्चे रसायन नष्ट केलं.
पोलिसांनी एकाच ठिकाणी उभं राहून गावची टेहाळणी केली
आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोयाळी गावात गावठी हातभट्टी जोमात चालते. अशा तक्रारी वाढत होत्या. यासाठी पोलिसांनी अनेकदा प्रत्यक्षात जाऊन पाहणी केली. पण पोलिसांना ही गावठी हातभट्टी दिसून येत नव्हती. तोपर्यंत पोलीस गावात येऊन गेलेत, याची खबर हातभट्टी मालकांला लागायची. मग एखादं दिवस हातभट्टी विक्री बंद व्हायची. पण दुसरा दिवस उजडताच, गावात झिंगाटलेले महाभाग दिसून यायचे. मग पोलिसांनी ही गावठी हातभट्टी उध्वस्त करण्यासाठी नामी शक्कल लढवली. त्यानुसार ड्रोन स्ट्राईक करायचं ठरलं. ड्रोन हवेत गेला, पोलिसांनी एकाच ठिकाणी उभं राहून गावची टेहाळणी केली. गावात काय हातभट्टी दिसेना, मग ड्रोनचा मोर्चा गावालगतच्या झाडाझुडपाकडे वळविण्यात आला. तिथं दोन-तीन झाडांच्या मधोमध एक हातभट्टी आढळली, ड्रोन जवळ घेऊन याची खात्री करण्यात आली. मालकाला याची खबर लागण्याआधीच पोलीस तिथं पोहोचले. मग जेसीबीला पाचारण करत, ही हातभट्टी उध्वस्त करण्यात आली. अंदाजे दहा लाखांची तब्बल वीस हजार लिटर कच्चं रसायन याद्वारे नष्ट करण्यात आलं.
पिंपरी चिंचवड शहरप्रमाणेच राज्यातील प्रत्येक भागात असेच अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत. त्या ठिकाणचे हे धंदे कायमस्वरूपी बंद करायची त्यांची इच्छाशक्ती असेल तर त्यांनी या ड्रोन स्ट्राईकचं अनुकरण करायला हवं. भविष्यात हा ड्रोन स्ट्राईक इतर कारवायांमध्ये ही वापरात आणण्याची गरज आहे. ज्या द्वारे गुन्हेगारांच्या मुसक्या आळवणे शक्य होईल. यासाठी गृहविभागाने सुद्धा अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचना द्यायला हव्यात. यामुळं राज्यातील गुन्हेगारी संपुष्टात येईल, याची खात्री देता येणार नाही. मात्र ती आटोक्यात येण्यास नक्कीच मदत होईल, यात शंका नाही.
शहर आणि लगतच्या ग्रामीण भागातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले
पिंपरी चिंचवड पोलिसांनी ड्रोन स्ट्राईकने ही पहिली मोठी कारवाई केली. यामुळं शहर आणि लगतच्या ग्रामीण भागातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. अडगळीच्या भागात आपले धंदे थाटून, हे महाभाग नामानिराळे राहायचे. पोलिसांना कारवाई करताना अनेक अडचणी यायच्या. अडगळीच्या भागात पोहचण कठीण व्हायचं. यावर पोलिसांनी ही नामीशक्कल शोधली आहे. ड्रोन स्ट्राईकमुळं आता जलदगतीने आणि नेमक्या स्पॉटवर छापा टाकणं आता पोलिसांना शक्य होणार आहे. आळंदी परिसरातील ही कारवाईची पहिली झलक आहे. आता या अवैध धंदेवाल्यांना असे उपद्व्याप बंद करण्याखेरीज कोणताही पर्याय उरलेला नाही.