पुणे: पुण्यात एका महविद्यालयीन विद्यार्थिनीने त्रासाला कंटाळून टोकाचं पाऊल उचलत आयुष्य संपवलं आहे. ताथवडे येथे इमारतीच्या पंधराव्या मजल्यावरून उडी मारून तिने आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासात तिच्या या निर्णया मागचं सत्य समोर आलं आहे. वर्गमित्राकडून सतत होणाऱ्या मानसिक, शारीरिक त्रासाला कंटाळून तिने जीवन संपवल्याचे समोर आले आहे. सहिती कलुगोटाला रेड्डी (वय 20, रा. अक्षरा इलेमेंटा सोसायटी, ताथवडे) असं या तरूणीचं नाव आहे. या प्रकरणात प्रणव राजेंद्र डोंगरे (वय 20, रा. मयूर समृद्धी, आकुर्डी गावठाण) याला पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान नेमकं काय घडलं आणि सहितीने असं जीवन संपवण्याचं का ठरवलं ते समोर आलं आहे
मैत्रिणीला पाठवलेल्या 42 मिनिटांच्या ऑडिओ क्लिप...
इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने पंधराव्या मजल्यावरून उडी घेतली आणि या घटनेनं पिंपरी चिंचवड शहर हादरलं. मात्र या आत्महत्येपूर्वी मैत्रिणीला पाठवलेल्या 42 मिनिटांच्या ऑडिओ क्लिपमधून यामागचं धक्कादायक कारण समोर आलं आहे. तब्बल 37 दिवसांच्या तपासानंतर अखेर वाकड पोलिसांनी प्रियकराला बेड्या ठोकल्या आहे. सहिती रेड्डी असं या विद्यार्थिनीच नाव होतं. तिने 5 जानेवारीला ताथवडे येथील राहत्या इमारतीवरून उडी मारली होती. तिचा प्रियकर प्रणव डोंगरेने शारीरिक आणि मानसिक छळ केल्यामुळं तिने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे.
मैत्रीचे रूपांतर प्रेमात अन् त्रासाला सुरूवात
सहिती आणि प्रणव आकुर्डीतील एका खाजगी महाविद्यालयात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होते. इथंच त्यांची मैत्री झाली, मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दोन वर्षांच्या मैत्रीत अलीकडच्या काळात वादाला तोंड फुटलं होतं. प्रणव वेळोवेळी तिचा मानसिक छळ करत होता. आता आपण आपलं नातं थांबवूयात, असं म्हणत तो तिला टॉर्चर करत होता. प्रणवचा शारीरिक आणि मानसिक छळ असह्य झालं होतं. म्हणून मी आता माझं आयुष्य संपवत आहे. अशा आशयाची ऑडिओ क्लिप बनवत सहिताने ती तिच्या जवळच्या मैत्रिणीला पाठवली. त्यामध्ये तिने स्वतःचा मोबाईल राहत्या इमारतीच्या टेरेसवर कुठं लपवून ठेवणार आणि त्याचा पासवर्ड काय आहे? हे सुद्धा पाठवलं होतं. फक्त ही ऑडिओ क्लिप पाठवल्यानंतर तीन तासाने मैत्रिणीला पोहचेल, अशी सेटिंग करुन ठेवली होती. त्यानंतर दुसऱ्या मजल्यावरील घरातून सहिती बाहेर पडली आणि ती थेट टेरेसवर पोहचली.
सहिताने उल्लेख केल्याप्रमाणे मोबाईल त्याच ठिकाणी
तिने ऑडिओ क्लिपमध्ये उल्लेख केलेल्या जागी मोबाईल लपवून ठेवला आणि सायंकाळी 5:45 वाजता पंधराव्या मजल्यावरील टेरेसवरून उडी घेतली. तिने आत्महत्या केल्याची खबर सोसायटीत समजली आणि कुटुंबियांना मोठा धक्का बसला. आत्महत्येच्या तीन तासानंतर जवळच्या मैत्रिणीला सहिताच्या मोबाईलवरून 42 मिनिटांची ऑडिओ क्लिप आली. सहिताने सायंकाळी पावणे सहा वाजता आत्महत्या केली असताना, मला रात्री साडे आठ वाजता सहिताच्या मोबाईलवरून ऑडिओ क्लिप आली. हे पाहून मैत्रिणीला ही मोठा धक्का बसला. मग तिने ऑडिओ क्लिप ऐकली आणि ही क्लिप सहिताने पाठवली का? याची खातरजमा करण्यासाठी ती टेरेसवर पोहचली. सहिताने क्लिपमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे मोबाईल त्याच ठिकाणी आहे का? मोबाईलचा पासवर्ड तोच आहे का? हे तिने प्रत्यक्षात जाणून घेतलं.
मात्र, हे सगळं ऐकून आणि पाहून मोठा धक्का बसलेल्या मैत्रिणीला यातून सावरायला बराच वेळ लागला. मग काही तासानंतर मैत्रिणीने सहिताच्या वडिलांना ही क्लिप ऐकवली, क्लिप ऐकून कुटुंबीयांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. मुलगी गेल्याचं दुःख, त्यात आत्महत्ये मागची सत्यता समोर आल्यानं कुटुंबियांना दुसरा मोठा धक्का बसला. आधी मुलीच्या सर्व विधी पार पडायचं आणि मग न्यायासाठी लढायचं असं ठरलं. त्यानुसार गेल्या आठवड्यात सहिताच्या वडिलांनी वाकड पोलिसांना गाठलं. ऑडिओ क्लिपबाबत कळवलं. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. ऑडिओ क्लिपची आणि मोबाईलची सत्यता पडताळली आणि प्रणवला बेड्या ठोकण्यात आल्या.