पुणे: पुण्यात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. काैटुंबिक वादातून पत्नीला शिव्या दिल्याच्या कारणावरून दाेन चुलत भावांमध्ये वाद झाला. त्यानंतर भावाने दुसऱ्या भावाला पाचव्या मजल्यावरून खाली ढकलून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पाचव्या मजल्यावरील बाल्कनीतून खाली पडलेला गंभीर जखमी हाेऊन त्याचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यातील नांदेड सिटीजवळ घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कौटुंबिक वादातून पत्नीला शिव्या देत असल्याच्या कारणावरून दोन चुलत भावांमध्ये मोठा वाद झाला. त्यानंतर एका भावाने दुसऱ्या भावाला पाचव्या मजल्यावरून ढकललं तो खाली जमिनीवर पडून गंभीर जखमी झाला, या घटनेमध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नांदेड सिटीजवळील धायरीगाव परिसरातील मतेनगरमधील कपील अपार्टमेंटमध्ये घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
ढकलणारा आणि मयत एकमेकांचे चुलत भाऊ
अमर किसन देशमुख (वय 34) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी राजू भुरेलाल देशमुख (रा. घायरी गाव, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मोहपत हरीराम साहारे (वय 36, रा. धायरीगाव, पुणे) याने आरोपी विरोधात पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. आरोपी राजू देशमुख व मयत अमर देशमुख हे एकमेकांचे चुलत भाऊ आहेत. ते मूळचे मध्य प्रदेशातील बालाघाट परिसरातील रहिवासी असून, कामानिमित्ताने ते पुण्यात आले होते.
सोनपापडी बनवण्याच्या कारखान्यात होते कामाला
धायरी परिसरामध्ये असलेल्या एका सोनपापडी बनवण्याच्या कारखान्यात ते काम करत होते. अमर देशमुख याच्या पत्नीला कौटुंबिक कारणावरून राजू देशमुख हा शिवीगाळ करत असल्याने त्यांच्यमध्ये वाद निर्माण झाला होता. सदर भांडणात मयत व्यक्ती हा आरोपीला मारण्यासाठी त्याच्या अंगावर धावल्याने आरोपीने मयत तरुणाला ढकलून दिलं. अमर देशमुख हा पाचव्या मजल्यावरील बाल्कनीतून खाली जमिनीवर पडून गंभीर जखमी होऊन मयत झाला. त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याने आरोपी राजू देशमुख याला अटक करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास नांदेड सिटी पोलिस करत आहे.