Pune Auto Rickshaw Fare Hike: पुणेकरांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. पुणे रिक्षा चालकांनी केलेल्या मागणीमुळे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने रिक्षा चालकांची भाडेवाढ करण्यासंदर्भातील नुकतेच आदेश काढले आहेत. यानुसार रिक्षा चालकांना आता चार रुपयांनी भाडे वाढ करता येणार आहे. त्यामुळे रिक्षा चालकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. रिक्षा चालकांना ही भाडे वाढ येत्या 1 सप्टेंबरपासून लागू होणार असून, पहिल्या एक किलोमीटरच्या टप्प्यासाठी रिक्षा चालकांना 25 रुपये आकारता येणार आहेत. तर पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 17 रुपये आकारता येणार आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, रिक्षा चालकांना पूर्वी पहिल्या टप्प्यातील एक किलोमीटरसाठी 21 रुपये भाडे आकारणी करता येत होती. तर त्या पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 14 रुपये भाडे दर आकारणे बंधनकारक होते. दरम्यान 1 सप्टेंबर पासून मीटर पुनः प्रमाणीकरण करून घेतील त्याच ऑटोरिक्षा धारकांकरिता भाडेसुधारणा लागू राहील. मीटर पुनः प्रमाणीकरणकरण्याची मुदत 31 ऑक्टोंबर पर्यंत आहे. जे ऑटोरिक्षाधारक विहित मुदतीत मीटर पुनः प्रमाणीकरण (Meter Calibration) करून घेणार नाहीत त्यांच्यावर 1 ते 40 दिवसांचा परवाना निलंबनाची कारवाई केली जाईल किंवा किमान 50 ते 2 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल.


मुंबईतील टॅक्सी आणि रिक्षा चालकांनीही केली भाडेदरात वाढ करण्याची मागणी 


मुंबईतील टॅक्सी चालक (Mumbai Taxi)  आणि ऑटोरिक्षा चालक यांनी देखील भाडेदरात वाढ करण्याची मागणी केली आहे. सध्या टॅक्सीचे किमान भाडे हे 25 रुपये इतके आहे. त्यात 10 रुपयांची वाढ करून ते 35 रुपये इतके करावे, अशी टॅक्सी युनियनने मागणी केली आहे. असं न केल्यास टॅक्सी चालक (Mumbai Taxi)  आणि ऑटोरिक्षा चालक 15 सप्टेबरपासून बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी रिक्षा टॅक्सी युनियन आणि सरकारमध्ये यासंदर्भात वारंवार बैठका झाल्या आहेत. मात्र सरकार आश्वासन देते, तोडगा काहीच नाही, म्हणून यावेळी आंदोलन करणारच असा इशारा रिक्षा टॅक्सी युनियनने दिला आहे. यामुळे यावरच लवकरच सरकारने तोडगा न काढल्यास  15 सप्टेबरपासून सामान्य मुंबईकरांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे.  


इतर महत्वाची बातमी: 


Mumbai Taxi : मुंबईतील टॅक्सी चालकांचा संपाचा इशारा, किमान प्रवासी भाडे 25 वरुन 35 रुपये करण्याची मागणी