Pune : पुण्यातील (Pune) पाषाण तलावालगत असणाऱ्या उद्यानात प्रवेश घेण्यास प्रेमीयुगुलांना बंदी घालण्यात आली होती. महापालिकेकडून तसा बोर्ड उद्यानात लावण्यात आला होता. या उद्यानातील पक्षांना आणि पक्षी निरीक्षकांना या कपल्सचा त्रास होतो असा महापालिकेच्या उद्यान विभागाचा दावा केला होता. आता ही बंदी हटवण्याचा निर्णय पुणे महापालिकेनं घेतला आहे. या उद्यानासमोरील  "Couple not allowed" चा फलक महापालिकेने उतरवला आला आहे. एबीपी माझ्याच्या बातमीनंतर आता पुणे महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.  


पुणे महानगरपालिकेने अविवाहित जोडप्यांना या परिसरात येण्यास मनाई केली होती आणि त्यासाठी 'Couple not allowed' असा बोर्ड लावला होता. हा फलक लावल्यानंतर पुण्यातील अनेक नागरिकांनी महापालिकेच्या या निर्णयाचा विरोध केला होता. या निर्णयाला कालच (शुक्रवार) "राईट टू लव्ह" संघटनेच्या च्या वतीने विरोध करण्यात आला होता. पुणे महानगरपालिकेने घेतलेला हा निर्णय त्वरित मागे घेण्यात यावा अशा मागणीचे निवेदन पालिका आयुक्तांना आणि उद्यान विभाग अधिक्षक अशोक घोरपडे यांना दिले होते. आज मात्र पाषाण तलावाच्या गेटवर लावण्यात आलेला फलक काढण्यात आला आहे. 


का घालण्यात आली होती बंदी?
पाषाणच्या तलावात आतपर्यंत दोन मृतदेह आढळले. महापालिकेची या उद्यानात सुरक्षादेखील नाही. प्रेमीयुगुलांमुळे वाद होऊ शकतात. शिवाय अनेक पक्षी अभ्यासक या ठिकाणी अभ्यासाला येतात. त्यांना अडथळा निर्माण होतो. त्यामुळे ही बंदी घातली होती. मात्र शहरातील बाकी उद्यानं प्रेमीयुगुलांसाठी खुली ठेवण्यात आली असल्याचं महापालिकेनं स्पष्ट केलं होतं. आता पाषाणमधील तलावालगतचं हे उद्यान देखील प्रेमीयुगुलांसाठी खुलं करण्यात आलं आहे. 


पाषाण तलावालगत सुंदर उद्यान आहे. अनेक प्रेमीयुगुल किंवा तरुण-तरुणी संध्याकाळी टेहाळण्यासाठी या उद्यानात येत असतात. मात्र याच उद्यानात थेट प्रेमीयुगुलांना नो एन्ट्री असा बोर्ड लावल्याने अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. हिरवंगार, थोडं शहराबाहेर आणि शांत ठिकाणी असल्याने या उद्यानात अनेक जातींचे पक्षी आढळतात. पक्षी निरीक्षक या पक्षांचा अभ्यास करण्यासाठी येतात. त्यांना या प्रेमीयुगुलांचा त्रास होतो, असं पालिकेचं स्पष्ट म्हणणं आहे. या उद्यानाची जैवविविधता जपता यावी, यासाठी महापालिका, स्थानिक नागरीक, पर्यावरण प्रेमी प्रयत्नात असतात. उद्यानाच्या संवर्धनासाठी देखील त्यांच्याकडून प्रयत्न केले जातात. 


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 


Pashan lake Garden: 'लव्ह बर्ड्स'चा 'बर्ड्स'ना त्रास, पाषाण तलावालगतच्या उद्यानात जोडप्यांना नो एन्ट्री, महापालिकेचा निर्णय