मुंबई : मुंबईतील (Mumbai News) प्रवाशांना येत्या 15 सप्टेंबरपासून अडचणीचा सामना करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचे कारण म्हणजे आपल्या मागण्या मान्य न झाल्यास मुंबईतील टॅक्सी चालक (Mumbai Taxi) आणि ऑटोरिक्षा चालक 15 सप्टेबरपासून बेमुदत संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. टॅक्सी आणि ऑटो रिक्षाच्या भाड्यात वाढ करावी, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. सध्या टॅक्सीचे किमान भाडे हे 25 रुपये इतके आहे. त्यात 10 रुपयांची वाढ करून ते 35 रुपये इतके करावे, अशी युनियनची मागणी आहे.
दिवसेंदिवस होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे टॅक्सी आणि रिक्षाचालकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. उत्पन्नातील जास्तीत जास्त पैसे हे सीएनजी भरण्यासाठी जात असल्याने जगायचं कसं या चिंतेत रिक्षा व टॅक्सी चालक आहेत. त्यामुळे प्रशासनाने आमच्याकडे लक्ष द्यावे असे रिक्षा व टॅक्सी चालक म्हणत आहेत. भाडेवाढ व्हावी अशी मागणी गेल्या काही महिन्यांपासून सरकार प्रशासनाकडे रिक्षा टॅक्सी युनियनतर्फे करण्यात आली आहे. सरकार लक्ष देत नसल्याने ते आता आंदोलनाच्या तयारीत आहेत. मुंबईतील टॅक्सी चालकांची 10 रुपये इतक्या भाडेवाढीची मागणी आहे, तशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
रिक्षा टॅक्सी युनियन आणि सरकारमध्ये यासंदर्भात वारंवार बैठका झाल्या. पत्रव्यवहार झाला मात्र सरकार आश्वासन देते, तोडगा काहीच नाही. त्यामुळे रिक्षा टॅक्सी चालक आता आंदोलन करणारच या भूमिकेत आहेत. यामुळे सर्वसामान्य माणूस हा भरडला जाणार आहे. आधीच सर्व वस्तूंच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे. कोरोनाच्या परिस्थितीनंतर कशीबशी परिस्थिती सावरत आहे. त्यात सर्वसामान्य माणसाला काय करावं हे कळेना. त्यातच आता रिक्षा टॅक्सीची भाडेवाढ किंवा संप या दोन्हींमध्ये सर्वसामान्य माणूस हाच चेपला जाणार आहे.
टॅक्सी युनियनने भाडे 25 रुपयावरून 35 रुपयाची वाढ करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आधीच महागाई, त्यात भाडेवाढीने अधिक मुंबईकरांच्या खिशाला कात्री बसणार आहे. भाडेवाढ व्हावी यासाठी रिक्षा टॅक्सी आंदोलन करणार आहेत. त्यातच सरकारने आणि या युनियनने बसून काहीतरी मार्ग काढायला हवा, अन्यथा सर्वसामान्यांचे हाल होणार आहे