पुणे : पुण्याच्या घोडेगावमध्ये बिबट्याने सलग दुसऱ्या दिवशी दुचाकीस्वारांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात चौघे जण जखमी झाले आहेत. शनिवार सायंकाळी साडे सातच्या सुमारास ही घटना घडली. घोडेगाव-भीमाशंकर रस्त्यावरील धोंडमाळ गावाजवळ बिबट्या दबा धरून बसला होता. त्यावेळी आलेल्या दुचाकीवर बिबट्याने थेट हल्ला चढवला.


या हल्ल्यात निलेश राऊत यांच्या डाव्या पायाला बिबट्याने चावा घेतला आहे. तर आणखी एका दुचाकीवर झेप घेत दोघांना बिबट्याने जखमी केले आहे. शुक्रवारीही पाच दुचाकींना लक्ष करत बिबट्याने सात जणांना जखमी केलं होतं.


बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनखात्याने शनिवारीच धोंडमाळ आणि हॉटेल सह्याद्री येथे दोन पिंजरे लावले होते. त्यानंतर काही तासात पिंजऱ्यापासून अवघ्या काही अंतरावर नरभक्षक बिबट्याने हा हल्ला केला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरलं आहे.


शुक्रवारी रात्रीही भीमाशंकर-घोडेगाव रोडवरील धोंडमाळ -शिंदेवाडी येथे बिबट्याने पाच दुचाकीस्वारांवर हल्ला करुन सात जणांना जखमी केले होते. नरभक्षक बिबट्याचा वेळीच बंदोबस्त करा, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. काही दिवसांपूर्वी घुलेवाडी येथील धनगराचा घोड्याला बिबट्याने ठार केलं होतं.