पुणे: होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. संजय सिंग आणि पांडुरंग वनारे अशी या दोघांची नावं आहेत. संजय सिंग हा रेल्वेमध्ये सेक्शन इंजिनिअर आहे, तर पांडुरंग वनारे हा रेल्वेमध्ये लोहार म्हणून काम करतो. हे दोघे होर्डिंग काढण्याचे काम करत होते. मात्र होर्डिंग वरुन कापण्याऐवजी त्यांनी खालून कापण्यास सुरुवात केली होती.होर्डिंग पडतेवेळी होर्डिंगखाली असलेली व्यक्ती उठून पळताना दिसते आहे. तो पांडुरंग वनारे आहे.


होर्डिंग कोसळलं 

पुण्यातील जुना बाजार चौकात अनधिकृतपणे उभारलेलं होर्डिंग अंगावर पडून चार जणांचा मृत्यू झाला, तर आठ जण गंभीर जखमी आहेत. शुक्रवारी दुपारी ही धक्कादायक घटना घडली. जुना बाजार चौकात रेल्वेच्या जागेमध्ये अनधिकृतपणे उभारण्यात आलेली होर्डिंग्ज काढत असताना ही घटना घडली. रेल्वे प्रशासनाकडून हे होर्डिंग्ज काढण्याचं काम सुरु होतं. मात्र ते करताना होर्डिंग्जचे अँगल्स वरुन कापत येण्याऐवजी खालून कापले जात असल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे.

चौकातून निघालेल्या पाच रिक्षा आणि एका कारमधील प्रवासी होर्डिंग्जच्या अँगल्सखाली आले. या चौकात पाच रस्ते एकत्र येतात. शनिवार वाडा, पुणे स्टेशन, आरटीओ कार्यालय, जिल्हा न्यायालय आणि मंगळावर पेठेतून येणारे रस्ते या चौकात एकत्र येतात.

सरकारी खाबूगिरी जबाबदार

पुण्यात होर्डिंग कोसळून झालेली दुर्घटना ही दुर्घटना नसून एक हत्याच आहे का? असा प्रश्न पडला आहे.  कारण या दुर्घटनेत झालेल्या 4 जणांच्या मृत्यूला सरकारी दिरंगाई आणि खाबूगिरी जबाबदार असल्याची धक्कादायक माहिती माझाच्या हाती लागली आहे. या होर्डिंगचं कंत्राट मिळालेल्या कंपनीनं करार संपल्यानंतर होर्डिंग काढण्याची परवानगी 5 महिन्यांपूर्वीच मध्य रेल्वे प्रशासनाकडे मागितल्याचा दावा केला आहे. पण त्यानंतरही परवानगी न दिल्यानं हे काम रखडलं होतं.

काही दिवसांपूर्वी हे काम सुरु झालं. पण त्यावेळी कर्मचाऱ्यांनी या होर्डिंगला आधार देण्यासाठी लागणारे अँगल कापून काढून ठेवल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यानंतरही या होर्डिंगवर राजकीय फलकबाजी सुरुच राहिली. त्यामुळे आता या लेट-लतिफीला आणि त्यामुळे झालेल्या अपघाताला आणि त्यात गेलेल्या 4 जणांच्या मृत्यूला रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचं दिसतंय.

दरम्यान मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख तसंच जखमींना 1 लाखाची मदत रेल्वेकडून जाहीर करण्यात आली आहे.

पत्नीच्या अस्थी विसर्जनानंतर पतीचा मृत्यू

या अपघातात शिवाजी परदेशी या रिक्षाचालकाचा मृत्यू झाला. दुर्देव म्हणजे शिवाजी यांच्या पत्नीचं परवा निधन झालं, काल ते आपल्या पत्नीच्या अस्थी विसर्जित करण्यासाठी निघाले होते, त्याचवेळी जुना बाजार परिसरात त्यांच्या रिक्षावर होर्डिंग कोसळले आणि शिवाजी यांचा जागीच मृत्यू झाला. अस्थी विसर्जनाला जात असताना त्यांच्यासोबत त्यांचा 4 वर्षीय मुलगा समर्थ, 17 वर्षांची मुलगी समृद्धी आणि आईदेखील होती. अस्थी विसर्जनासाठी परदेशी कुटुंबीय आळंदीला गेले होते. मात्र परतीच्या प्रवासावेळी हे होर्डिंग्स त्यांच्या रिक्षेवर कोसळले आणि होत्याचं नव्हतं झालं.

रेल्वेच्या या गलथान कारभारामुळे अवघ्या 48 तासांत मुलांच्या डोक्यावरून आई-वडिलांचं छत्र हरपलं.

संबंधित बातम्या 

पुणे: खालून होर्डिंग कापणाऱ्या दोघांना बेड्या  

पत्नीच्या अस्थी विसर्जित करुन परतताना पुण्यात रिक्षाचालकाचाही मृत्यू  

पुणे होर्डिंग दुर्घटनेला सरकारी दिरंगाई आणि खाबूगिरी जबाबदार