पुणे : पुण्यातील बावधन परिसरात चार महिन्याच्या चिमुरडीला उघड्यावर टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. काल दुपारच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. माध्यमात बातमी आल्यानंतर अखेर सायंकाळी या बाळाच्या कुटुंबियांचा शोध अखेर लागला. सध्या ही मुलगी वडिलांच्या ताब्यात असून तिची आई मात्र बेपत्ता होती. ही आई देखील आता सापडली आहे. मानसिक ताणतणावातून हे कृत्य केले असल्याचे समोर आले आहे. तसंच रात्रभर ही चिमुरडी वारजे पुलाखाली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
माहितीनुसार, बावधन परिसरातील एका निर्जन ठिकाणी झाडाखाली कपड्यात गुंडाळलेल्या अवस्थेत चार महिन्याची मुलगी सापडली. चांदणी चौकापासून काही अंतरावर एक पाण्याची टाकी आहे. दुपारच्या सुमारास ही चिमुरडी येथील एका झाडाखाली आढळली. रडण्याचा आवाज ऐकू येत असल्यामुळे काही नागरिकांनी जाऊन पाहणी केली असता हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. कोथरूड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलीला ताब्यात घेतले.
सायंकाळी या बाळाच्या वडिलांचा शोध लागला. माध्यमात बातमी पाहिल्यानंतर बाळाच्या वडिलांनी कोथरूड पोलिसात धाव घेतली आणि ही आपलीच मुलगी असल्याचे सांगितले. ही मुलगी वडिलांच्या ताब्यात दिले होते तिची आई मात्र बेपत्ता होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव परिसरातील तुकाराम क्षीरसागर यांची ही मुलगी आहे. बातमी व्हायरल झाल्यानंतर शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने तुकाराम यांना तुमची मुलगी असल्याचे सांगितले. त्यानंतर तुकाराम क्षीरसागर हे कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये आले आणि त्यांनी मुलीचा ताबा घेतला. तुकाराम हे पत्नी लक्ष्मीसह एकत्र कुटुंबात राहतात. ते स्वतः फर्निचरची कामे करतात. त्यांना यापूर्वीही एक मुलगा आणि मुलगी आहे.
आज दुपारी तुकाराम कामावर गेले असताना बाळाची आई लक्ष्मी क्षीरसागर ही दवाखान्यात जाते असे सांगून घराबाहेर पडली ती परतली नव्हती. कुटुंबियांनी शोधाशोध केली पण सापडली नाही. दरम्यान आज बाळाची बातमी पाहून तुकाराम यांना धक्काच बसला. त्यांनी कोथरूड पोलिसात धाव घेत ही आपलीच मुलगी असल्याचे सांगितले.
तुकाराम क्षीरसागर यांनी सांगितल्यानुसार, घरात भांडणं नाही, काही नाही तरीही पत्नीने असे का केले हे माहीत नाही. पोलिसांनी या बाळाला वडिलांच्या ताब्यात सोपवले असून आईचा शोध सुरू होते. अखेर आज आईदेखील सापडली आहे.