पुणे : पुण्यात एकाच कुंटुबातील चौघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये अतुल दत्तात्रय शिंदे आणि जया अतुल शिंदे या दाम्पत्या त्यांच्या सहा वर्षीय मुलाचा तीन वर्षीय मुलीचा समावेश आहे. गुरुवारी (18 जून) रात्री ही घटना उघडकीस आली. पण आत्महत्या काही दिवसांपूर्वी झाली असण्याची शक्यता आहे. भारती विद्यापीठ पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. सुखसागर नगरच्या वाघजाईनगर हे कुटुंब राहत होतं.


या कुटुंबाचे प्रमुख अतुल शिंदे हे ओळखपत्रे बनवून देण्याचं काम करत होते. तेच त्यांच्या उपजीविकेचं एकमेव साधन होतं. मात्र गेल्या काही महिन्यांपासून लॉकडाऊन सुरु असल्याने त्यांचा व्यवसाय बंद होता. अतुल शिंदेंनी त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांसह आत्महत्या करताना कोणतीही सुसाईड नोट मागे ठेवल्याचं अजून तरी पोलिसांना तपासात आढळून आलेलं नाही. परंतु आत्महत्या करण्यापूर्वी अतुल शिंदे यांनी घरातील भिंतीवर मजकूर लिहून ठेवला आहे. आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरु नये असा त्यात उल्लेख आहे.


मागील दोन दिवसांपासून त्यांच्या घरात कोणतीही हालचाल दिसून येत नव्हती किंवा फोन आणि व्हॉट्सअॅपलाही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे शेजार्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी काल रात्री घराचा दरवाजा उघडला असता आत्महत्येचा प्रकार समोर आला. त्यांच्या आत्महत्येचं नेमके कारण अजून समजू शकलेलं नाही. परंतु व्यवसाय बंद असल्याने आर्थिक परिस्थितीमुळे या कुटुंबाने जीवन संपवलं असावं का याचा पोलीस तपास करत आहेत.