पिंपरी-चिंचवड : पुण्याच्या कळंबमध्ये चार दिवसात तिसऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं आहे. 16 जानेवारीला पाच शेळ्या या बिबट्याने ठार केल्या होत्या. या प्रकरणाला गांभीर्याने घेत वनविभागाने सापळा रचून बिबट्याला जेरबंद केलं.


पहिल्याच दिवशी म्हणजे 17 जानेवारीला एक बिबट्या पिंजऱ्यात फसला इतर दोन मात्र पिंजऱ्याच्या वरती बसल्याचे गावकऱ्यांनी पाहिले. मग 18 जानेवारी आणि आज दोन्ही बिबटे जेरबंद झाले. बिबटे जेरबंद झाल्याने गावकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. बिबट्यांचे हल्ले, अपघातांचे सत्र पाहता आंबेगाव तालुक्यात बिबट्या निवारा केंद्र उभारण्याची मागणी होऊ लागली आहे.


पुणे जिल्ह्यात विविध भागातील गेल्या दीड महिन्यातील बिबट्याचा वावर




  • 18 जानेवारी - आंबेगाव तालुक्यातील कळंबमध्ये बिबट्या जेरबंद

  • 17 जानेवारी - कळंबमध्येच बिबट्या पिंजऱ्यात फसला

  • 16 जानेवारी - बिबट्याने कळंबमध्ये शेतकऱ्याच्या पाच शेळ्या ठार केल्या

  • 14 जानेवारी - जुन्नरच्या वळणवाडीत अवघ्या सहा सेकंदात बिबट्याने कुत्र्याची केलेली शिकार सीसीटीव्हीत कैद

  • 21 डिसेंबर - चास येथे बिबट्याचा दुचाकीवर हल्ला, विद्यार्थिनी थोडक्यात बचावली

  • 18 डिसेंबर - जुन्नरच्या अहिनेवाडीत कोंबड्याच्या पिंजऱ्यात बिबट्या घुसला, थरारक रेस्क्यूनंतर बिबट्या जेरबंद

  • 15 डिसेंबर - खेड तालुक्यात मानववस्तीत बिबट्या घुसला, सुदैवाने आजारी असल्याने बिबट्याला झुडपात लपाव लागलं. थरारक रेस्क्यूनंतर बिबट्या जेरबंद

  • 2 डिसेंबर - लोणावळ्याच्या अॅम्बी व्हॅलीत शिकारीला लावलेल्या फासात अडकून बिबट्याचा मृत्यू

  • 1 डिसेंबर - जुन्नरच्या ओतूर-उदापूरदरम्यान अपघातात बिबट्याचे पाय निकामी, उपचारादरम्यान मृत्यू