पुणे : पुण्यात चायनीजच्या गाडयावर फुकट जेवणं करुन दमदाटी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराचे तुकडे करुन जाळल्याप्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. विकी पोताण असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव असून 10 महिन्यांपूर्वी संबंधित प्रकार घडला होता.


विकी रमेश पोताण या सराईत गुन्हेगाराचा काही महिन्यांपूर्वी खून करण्याच्या गुन्ह्यात या सर्वांचा हात असल्याचं तपासात उघड झालं आहे.

काल (सोमवार) पुण्यातील बी. टी. कवडे रोडवर दरोडा टाकण्यासाठी काही जण येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावेळी पोलिसांनी सापळा रचून पाच आरोपींना ताब्यात घेतले. यावेळी तपासात विकी पोताण या सराईत गुन्हेगाराची काही महिन्यांपूर्वी हत्या केल्याची कबुलीही या गुन्हेगारांनी दिली.

याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिटनं एकूण पाच आरोपींना अटक केली. विक्रम पिल्ले,राजू नाईक, संभू थापा, फारुख शेख, शाहरुख शेख असं अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत. यामधील आरोपी विक्रम पिल्ले याच्या चायनीज गाड्यावर येऊन फुकट जेवण करुन त्यांना दमदाटी करत असे. याच रागातून विक्रम पिल्ले आणि त्याच्या साथीदारांनी दहा महिन्यांपूर्वी विकीचा खून करुन त्याच्या मृतदेहाचे तुकडे करुन ते जाळून टाकले होते. खून झालेल्या विकी पोताणवर देखील अनेक गुन्हे दाखल होते.

दरम्यान, पोलिसांनी आरोपीकडून एअर गन, चार कोयते, मास्क, दोरी, मोबाइल असा 18 हजार 300चा माल जप्त केला. सध्या पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.