पुणे : स्वारगेट डेपोमधून आज पुण्यातून स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी पहिली बस आज रवाना झाली. पुण्यातून अहमदनगरला ही बस गेली. नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालय आणि पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर अहमदनगरकडे ही बस रवाना झाली. देशभरात अडकलेल्या मजुरांना घरी जाण्यासाठी केंद्राने श्रमिक विशेष रेल्वे सुरू करण्यात आली आहे. याच धर्तीवर आता राज्यातील कानाकोपऱ्यात अडकलेल्या विद्यार्थी, नागरिक, गरजू लोकांना घरी पोहचवण्यासाठी लालपरी धावणार आहे. पुण्यात राज्याच्या अनेक जिल्ह्यातून विद्यार्थी अभ्यासासाठी येत असतात. लॉकडाऊनमुळे अनेक विद्यार्थी अडकून पडले होते. त्यांना घरी पोहचवण्यासाठी पहिली बस रवाना झाली.


पुण्याहून नगर जिल्ह्यात जाण्यासाठी 43 विद्यार्थ्यांना परवानगी देण्यात आली होती. यापैकी 20 विद्यार्थ्यांना घेऊन ही बस रवाना झाली. सृजन फौंडेशन व MPSC STUDENTS RIGHTS यांच्या प्रयत्नांमधून विद्यार्थ्यांना घरी जाण्याची व्यवस्था करण्यात आली. गेला दीड महिना स्पर्धा परिक्षांची तयारी करणारे विद्यार्थी पुण्यात अडकून आहेत. जेवणाची आबाळ, आर्थिक चणचण यामुळे आम्हाला घरी जाण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी ते करत होते. एमपीएससी स्टूडंट राईट संस्थेनं गोळा केलेल्या माहितीनुसार जवळपास 2300 विद्यार्थी पुण्यात अडकले आहेत. येत्या काही दिवसांमध्ये बाकीच्या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांचीही जाण्याची व्यवस्था करण्यात येईल असं एमपीएससी स्टूडंट राईटतर्फे सांगण्यात आलं.


लॉकडाऊनबाबत सरकारचा एक्झिट प्लॅन काय?, राज ठाकरेंची विचारणा; सरकारला नऊ सूचना


घरी जाताना नियमांचं पालन
हे विद्यार्थी जाताना त्यांनी सोशल डिस्टंसिंगचं पालन केलं. तसंच त्यांच्या गावी पोहोचल्यानंतरही त्यांना 14 दिवस क्वॉरंटाईनमध्ये राहण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. आज घरी जाताना खूप आनंद होत असल्याची भावना या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. घरच्यांनाही खूप आनंद झाला असल्याचं त्यांनी सांगितलं. याच प्रकारे अन्य विद्यार्थ्यांनाही घरी पोहचवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.


राजर्षी शाहू महाराजांबद्दलच्या 'त्या' ट्वीटबाबत देवेंद्र फडणवीसांकडून दिलगिरी


आजपासून लालपरी धावणार
राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात अडकलेल्या विद्यार्थी, पर्यटक, मजुर आणि इतर लोकांना त्यांच्या घरी पोहचवण्यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. एसटी बसच्या माध्यमातून अशा गरजवंताना घरी पोहचवणार असल्याची माहिती राज्य परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. या पार्श्वभूमीवर आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संमतीनंतर हा निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


Lockdown 3 | पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे 20 विद्यार्थी गावाकडे रवाना | ABP Majha