पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकराच्या हत्येप्रकरणी तब्बल पावणे तीन वर्षांनंतर पहिली अटक करण्यात आली आहे. सनातन संस्थेशी संलग्नीत असलेल्या हिंदू जनजागरण समितीच्या वीरेंद्र तावडेला सीबीआयनं अटक केली आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येमागे हिंदुत्त्ववादी संघटनाचा हात असल्याच्या संशय आणखी गडद झाला आहे.
दरम्यान गेल्या आठवड्यात सीबीआयनं सारंग अकोलकर आणि वीरेंद्र तावडे यांच्या घरावर छापे मारले. तेव्हापासून वीरेंद्र तावडेची सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. वीरेंद्र तावडे आणि सारंग अकोलकर ई-मेल द्वारे एकमेकांच्या संपर्कात असल्याचं चौकशीअंती निष्पन्न झालं. शुक्रवारी संध्याकाळी वीरेंद्र तावडेला चौकशीसाठी बोलावण्यात आल्यानंतर सीबीआयकडून अटक करण्यात आली. आज सकाळी वीरेंद्र तावडेला पुण्याच्या न्यायालयात हजर केलं जाणार आहे.
पनवेलमधील सनातनच्या आश्रमाजवळच तावडेचे घर
पनवेलमधील सनातनच्या आश्रमाजवळच तावडेचे घर आहे. मागील आठवड्यातील छाप्यानंतर तावडेला सीबीआय चौकशीसाठी बोलावत होती. आज चौकशीसाठी बोलावल्यानंतर आज सीबीआयने त्याला अखेर अटक केली. वीरेंद्र तावडेला उद्या पुण्यातील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
...तर पानसरे-कलबुर्गींची हत्या टाळता आली असती: हमीद दाभोलकर
'डॉक्टरांच्या हत्येनंतर तातडीने ही अटक झाली असती, तर पानसरे-कलबुर्गींची हत्या टाळती आली असती.' अशी खंत आज हमीद दाभोलकर यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केली.
'तीन वर्षे पहिल्या अटकेसाठी लागतात म्हणजे डॉक्टरांचा नियोजनबद्धपणे खून केला गेला आहे तो रागाच्या भरात करण्यात आलेला नाही.' असंही हमीद म्हणाले.
सारंग अकोलकरचा फोटो आणि डॉक्टरांच्या खुन्यांचे रेखाचित्र यात साम्य आहे. कोर्टातही या दोन्ही गोष्टी सादर करण्यात आल्या होत्या. मात्र, तरीही अटकेसाठी उशीर करण्यात आला. असा आरोप हमीद यांनी केला आहे.
20 ऑगस्ट 2013 रोजी डॉ. दाभोलकरांचा खून:
डॉ. दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यात हत्या करण्यात आली होती. मात्र, याप्रकरणी तपास अतिशय संथ गतीने सुरु असल्यानं हा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला होता.
वीरेंद्र तावडेकडून काय माहिती मिळते, हे महत्त्वाचं ठरणार आहे. पानसरे आणि दाभोलकर या दोन्ही हत्येत अटक झालेल्या व्यक्ती सनातनशी संबंधित आहेत. हा दोन्ही हत्येतील समान दुवा आहे.