बारामती: बारामती नगरपरिषदेच्या प्रवेशद्वाराला आज फटाक्यांमुळे आग लागल्याची घटना घडली. स्वीकृत सदस्य म्हणून निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या सदस्याच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी उडवलेल्या फटाक्यांमुळे ही आग लागली.
राष्ट्रवादीचे किरण गुजर, अमर धुमाळ, सुधीर पानसरे, गणेश सोनावणे आणि उपनगराध्यक्ष जय पाटील यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड झाली. आज नवनियुक्त सदस्यांच्या कामकाजाचा पहिलाच दिवस होता. त्यामुळे उत्साहाच्या भरात कार्यकर्त्यांनी फटाके फोडले.
याच फटाक्यांमुळे नगरपरिषदेच्या गेटनं अचानक पेट घेतला. ऐनवेळी आग पेटल्यानं सगळ्यांचीच धांदल उडाली. ही आग तब्बल 15 मिनिटांनंतर विझवण्यात यश आलं. मात्र, नगराध्यक्षांसह सर्व सदस्यांनी या घटनेकडे कानाडोळा केल्याचं दिसून आलं.