पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन परीक्षा सध्या सुरु आहेत. आज दुपारी 1 ते 2 च्या दरम्यान असलेल्या ऑनलाईन परीक्षेदरम्यान विद्यापीठाचं सर्व्हर डाऊन झाल्यामुळे एकच हल्लकल्लोळ झाला. सर्व्हरच डाऊन झाल्यामुळे पेपर सोडवताना विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींच्या परीक्षेचा सामना करावा लागला. सर्व्हरच्या प्रॉब्लेममुळे विद्यार्थी सोडवलेला ऑनलाईन पेपर सबमिट करू शकले नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांना परत लॉगईन करुन तो पेपर परत सोडवावा लागला आणि परत लॉग इन केल्यावर पुर्णपणे नवीन प्रश्न असलेला पेपर समोर आल्याची तक्रार विद्यार्थी करत आहेत.


आज दुपारी 1.30-1.45 दरम्यान सावित्रीबाई फुल पुणे विद्यापीठाचा सर्व्हर डाऊन झाला असल्याची माहीती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यानंतर लगेचच सर्व्हर रिस्टोअर केल्याचा दावाही विद्यापीठाने केला. पण यामुळे ऑनलाईन परिक्षांमध्ये विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला.


पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या


“मी पेपर सोडवत असताना काही प्रश्नांची उत्तरे सबमीट करताना सारखा ‘वेटींग’ असा मेसेज स्क्रीनवर येत होता. यातच 1.25 तास गेला. पुर्ण पेपर सबमीट करताना 25-30 वेळा ‘एरर’चा मेसेज आला. त्यानंतर मी परत लॉग इन केलं तेव्हा लक्षात आलं की पेपर सबमीट झाला नव्हता. माझ्यावर परत पेपर सोडवण्याची वेळ आली आणि त्या पेपरमधले प्रश्न पुर्णपणे नवीन होते. जास्त कठीण होते. मी जर नापास झालो तर त्याला जबाबदार कोण असणार?” जुन्नर तालुक्यातील एमएस्सी ऑरगॅनिकच्या विद्यार्थ्याने सांगितलं.


विद्यापीठाने दिलेल्या हेल्पलाईनवरुनही कोणतीच मदत मिळाली नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. ऑनलाईन पेपर सोडवताना जर काही तांत्रिक अडचण आली तर जो प्रश्न सुरु आहे त्यापासून परत परिक्षा होईल असं विद्यापीठाकडून सांगण्यात आलं असल्यानंतरही, विद्यार्थ्यांना परत पुर्ण पेपर का सोडवावा लागला? असा प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत.


अभिनव कॉलेजच्या टीवाय बीबीएच्या विद्यार्थ्यांनी सांगितल्यानुसार “पेपर सोडवताना कधी सर्व्हर कधी सुरु असायचा. कधी बंद असायचा. शेवटपर्यंत कळत नव्हतं की पेपर सबमीट झाला आहे की नाही.” अंतिम वर्ष परिक्षेतील तांत्रिक अडचणींचा घोळ मात्र काही संपत नाहीये.