पुणे: मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे वर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास बस 20 फूट खाली खड्ड्यात कोसळली. मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे वरून कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोने मागून धडक दिल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस मार्ग सोडून खड्ड्यात कोसळली. या अपघातामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जवळच्या रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर हा अपघात झाला आहे, या अपघातानंतर खाजगी बस 20 फूट खड्ड्यात कोसळली. कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोने मागून धडक दिली, त्यानंतर चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस मार्ग सोडून खड्ड्यात कोसळली. सुदैवाने या भीषण अपघातामध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही, मात्र बसमधील अकरा प्रवासी यात जखमी झाले आहेत. मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
संबधित घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासन आणि बचाव पथकाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.
मतदान कर्तव्यावरून घरी जाताना अपघातात एकाचं निधन
जळगाव जिल्ह्यात मतदान कर्तव्यावर असलेले लक्ष्मीकांत वासुदेव पाटील उपशिक्षक अनवर्दे -बुधगांव (वय -49) हे मतदान ( बी. एल.ओ.) कर्तव्यावरून त्यांच्या बभळाज तालुका शिरपूर मूळगावी परत जात असताना त्यांचा अपघात झाला. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी या अत्यंत दुर्दैवी घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.