Upwas Thali In Pune : उपवासाचे तेच तेच (Pune) पदार्थ खाऊन अनेकांना कंटाळा आला असेलच. त्यात महाशिवरात्री किंवा अशा अनेक सणांना अखंड दिवस उपवास असतो. नेमका कोणता पदार्थ बनवायचा (upwas thali) असा प्रश्न घरातील प्रत्येक महिलेला पडतच असेल. त्यात बाहेर जाऊन उपवास सोडायचा म्हटलं की साबुदाणा खिचडी नाहीतर साबुदाणा वडे हे दोनच (fasting thali) पदार्थ चांगले आणि चविष्ट मिळतात. मात्र या सगळ्याला पर्याय आता पुण्यातील अनेक हॉटेल्सने उपलब्ध करुन दिले आहेत. त्यांनी आता पुण्यात चक्क उपसाची थाळी सुरु केली आहे आणि अर्थातच नेहमीप्रमाणे खवय्ये असणारे पुणेकर या थाळीवर ताव मारताना दिसत आहेत.
पुण्यातील अनेक हॉटेल्स नेहमीच काहीतरी भन्नाट आयडिया शोधून काढतात. कधी एका पदार्थावर एक पदार्थ फ्री तर कधी स्पेशल थाळीवर वेगवेगळे ऑफर्स असतात. या सगळ्या भन्नाट आयडियासाठी पुणेकर कायम दाद देतात. त्यात हॉटेल मालकांनी आता उपवासावरदेखील पर्याय शोधून काढला आहे. थेट उपवासाची थाळी सुरु करुन त्यांनी उपवासासाठी पुणेकरांना चविष्ट पदार्थांची मेजवानी दिली आहे.
उपवासाच्या थाळीत काय काय असतं?
काही मोजक्याच हॉटेल्समध्ये उपवासाची थाळी उपलब्ध आहेत. या थाळीत भगर (वरीचा), आमटी, बटाट्याची भजी, साबुदाणा खिचडी, राजगीऱ्याची पुरी, पापड, दही थालीपीठ, साबुदाणा वडा, ताक, शिंगाड्याच्या पिठाची पुरी आणि आईस्क्रीम हे पदार्थ असतात.
कोणकोणत्या हॉटेल्समध्ये उपवासाची थाळी मिळेल?
श्रेयस हॉटेल
पुणेकरांचं आवडतं हॉटेल म्हणजे आपटे रोडवरील श्रेयस हॉटेल. दर रविवारी या हॉटेलसमोर पुणेकरांच्या रांगा लागतात. याच हॉटेलमध्ये उपवासाची थाळीदेखील उपलब्ध आहे. आमटी, बटाट्याची भजी, साबुदाणा खिचडी, राजगीरा पुरी पापड आणि सोबत गोड पदार्थ दिला जातो.
हॉटेल अभिजात नारायण पेठ
नारायण पेठेतील हॉटेल अभिजातमध्येही चविष्ट उपवासाची थाळी मिळेल. साधारण आमटी, बटाट्याची भजी, साबुदाणा खिचडी, राजगीरा पुरी पापड आणि सोबत गोड पदार्थ आणि केळीचं शिखरण दिलं जातं.
वाडेश्वर हॉटेल
पुण्यातील प्रसिद्ध वाडेश्वर हॉटेलची उपवासाची थाळी पुण्यात प्रसिद्ध आहे. दर गुरुवारीदेखील ही थाळई उपलब्ध असते आणि उपवासाच्या दिवशी म्हणजेच चतुर्थी, महाशिवरात्री या दिवशी अनेक पुणेकर उपवासाच्या दिवशीही भरपेट थाळीचा आस्वाद घेताना दिसतात.
गणेश भेळ
पुण्यातील सदाशिव पेठेतील गणेश भेळमध्ये उपवासाची थाळी नाही तर उपवासाची मिसळ आणि भेळ मिळते. त्यात विविध पापड, थोडी खिचडी, उपवासाचा गोड-तिखट चिवडा आणि त्यावर दही या सगळ्यांना एकत्र करुन उपवासाची भेळ तयार केली जाते. त्यावरच गरम आमटी टाकून उपवासाची मिसळ मिळते. भेळ आणि मिसळ दोन्ही चविष्ठ असतात.