पुणे : दैवी शक्तीच्या साहाय्याने कुटुंबाला झालेली बाधा दूर करतो, अशा बहाण्याने महिलेसह तिच्या सासूवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील या कुटुंबाचे 12 वर्षं आर्थिक व शारीरिक शोषण करणाऱ्या साताऱ्यामधील भोंदूबाबाला खडक पोलिसांनी अटक केली आहे. हैदरअली शेख असं या भोंदूबाबाच नाव आहे.
हैदरअली शेख याने 2004 सालापासून फसवणूक करत 2016 पर्यंत अत्याचार केल्याचा आरोप महिलेच्या कुटुंबानं केला आहे. पीडित महिला ही मूळची साताऱ्याची आहे. 1999 साली तिचा विवाह झाला. पतीचा पुण्यात व्यवसाय असल्याने ते पुण्यात स्थायिक झाले. मात्र तिला 2003 मध्ये रक्ताच्या उलट्या होणे, बेशुद्ध होणे, चक्कर येणे असा त्रास होऊ लागला.
पुण्यातील अनेक नामांकित रुग्णालयांमध्ये उपचार केल्यानंतरही त्याचा काही परिणाम होत नसल्यानं त्यांनी हैदरअली या भोंदूबाबाचा आधार घेतला. महिलेच्या सासूला हैदरअली शेखकडे दैवी शक्ती असल्याचे समजल्याने ते भोंदूबाबाच्या संपर्कात आले. आरोपीने याचाच फायदा उठवत अत्याचार केला आणि पैसेही लुटले.
आरोपी हैदरअलीने महिलेच्या पतीलाही आपल्या बोलण्यातून भुलविले होते. त्यामुळे पीडित महिलेचा पती कोणत्याही कामासाठी भोंदूबाबाचा सल्ला घेत असे. यासाठी हा बाबा वेळोवेळी मोठी रक्कमही घेत असे. तसंच महिलेसोबत त्याने तिच्या सासूवरही वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेऊन अत्याचार केले. त्याचं त्याने व्हिडीओ शूटिंगही केलं.
या भोंदूबाबाने पीडितेच्या कुटुंबाकडून 8 लाख रुपये, साताऱ्यातील फ्लॅट, तीन महागड्या मोटारी, मोटर सायकल, पुण्यातील ऑफिस स्वत:कडे घेतले. महिला आणि सासूनंतर भोंदूबाबाची नजर त्यांच्या 14 वर्षांच्या मुलीवर पडली. तिच्याशीही त्याने शारीरिक लगट करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली .
या भोंदूबाबाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि जादूटोणा प्रतिबंध कायदा व माहिती व तंत्रज्ञान कायदा, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे.
कौटुंबिक बाधा दूर करण्याचा बहाणा, भोंदूबाबाचे महिलेसह सासूवर लैंगिक अत्याचार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Dec 2017 07:31 PM (IST)
दैवी शक्तीच्या साहाय्याने कुटुंबाला झालेली बाधा दूर करतो, अशा बहाण्याने महिलेसह तिच्या सासूवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -