पुणे: पिंपरी चिंचवडमधील भोसरीनंतर आता ताथवडे येथील पंडित ऑटोमोटिव्ह कंपनी अचानकपणे बंद करण्याचा निर्णय कंपनी संचालकांनी घेतला आहे.


आर्थिक मंदी, नोटबंदी आणि जीएसटीमुळे ही परिस्थिती उद्भवल्याचं संचालकांचे म्हणणे आहे. यामुळं जवळपास अडीचशे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

या कामगारांचा गेल्या पाच महिन्यांचा पगारही थकला आहे. साठ वर्षांपूर्वीपासून टाटा कंपनीची डीलरशिप घेणाऱ्या या कंपनीवर अशी पहिल्यांदाच वेळ आली आहे.

पुणे, सातारा आणि सांगली येथील कंपन्यांचीदेखील हीच परिस्थिती आहे. परिस्थिती सुधरवण्यासाठी संचालकांनी सांगलीची कंपनी तर विकण्यासाठी काढली होती, मात्र कामगारांच्या विरोधामुळं ते होऊ शकलं नाही. तर पुण्याच्या टिळक रोड येथील जागेत कमर्शिअल आणि रेसिडेंशल स्कीम सुरू करण्यात आली.

परंतु तेथे ही सेल होऊ शकला नाही. त्यामुळं ही कंपनी बंद करण्याची वेळ आल्याचं कंपनीचे संचालक विजय गोखले आणि ताथवडेचे एमडी सिद्धार्थ गोखले यांनी सांगितलं. मात्र त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला.