पुणे: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वेग मर्यादा पाळण्यासाठी मोहीम सुरु आहे. मात्र या मोहिमेची पाहणी करायला गेलल्या मंत्र्यांनीच वेगमर्यादेच भंग केल्याचं दिसतं आहे.


कारण मुंबईहून पुण्याच्या दिशेनं निघालेले दिवाकर रावते आणि एकनाथ शिंदे यांची गाडी शंभर ते 120 च्या गतीनं धावत होती. खरं तर एक्स्प्रेस वेवर 80 च्यावर गाडी चालवणाऱ्यांकडून पोलीस दंड वसूल करत होते. मात्र मंत्र्यांची गाडीच शंभरच्या वर असल्यामुळे त्यांच्याकडून कुठलाही दंड वसूल करण्यात आला नाही. त्यामुळे एक्स्प्रेस वेवर नियम फक्त सामान्यांसाठी आहेत का असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

दरम्यान, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघाताचं सत्र सुरु झालं आणि वाहतूक पोलिसांना जाग आली. सकाळपासून पोलिसांनी एक्स्प्रेस वे वर वाहतुकीचे नियम पायदळी तुडवणाऱ्या वाहनांवर धडक कारवाई सुरु केली.

कळंबोली ते उर्से टोलनाक्यादरम्यान सुरु केलेल्या मोहिमाला परिवहनमंत्री दिवाकर रावते आणि एकनाथ शिंदेंनीही भेटही दिली.

नियम मोडणाऱ्या वाहनांवर नजर ठेवण्यासाठी 20 अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. 1 ते 8 जूनच्या काळात सुमारे 1249 वाहनांकडून दंड वसूल करण्यात आला आहे.