पुणे: राज्यात सध्या मुख्यमंत्रीपदावरून अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. अशातच काल (बुधवारी) काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री पदाबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मुख्यमंत्रीपदासाठीचे प्रबळ दावेदा मानले जातात. अशातच महायुतीतील नेत्यांनी त्याबाबत प्रतिक्रिया दिल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या (Ajit Pawar) पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्रीपदाबाबतची प्रतिक्रिया देताना मोठं वक्तव्य केलं आहे. ओबीसी मुख्यमंत्री व्हावा, यापेक्षा गोर-गरिबांचं संरक्षण करणारा मुख्यमंत्री राज्याला भेटावा ही अपेक्षा आहे, असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे. 


भाजपचाच मुख्यमंत्री होईल, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मागच्या काही वर्षांमध्ये खूप चांगलं काम केलं आहे, याआधी ते मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होते. पण पक्षाने त्यावेळेस उपमुख्यमंत्री म्हणून काम दिलं. त्यांनी चांगलं काम केलं आणि झोकुन देऊन काम केलं. मुख्यमंत्री होणं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा नैसर्गिक हक्क आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, असंही पुढे छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. 


अजित पवार मुख्यमंत्री झाले तर..


अजित पवार मुख्यमंत्री झाले तर या प्रश्नावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले, दादा मुख्यमंत्री झाले तरी चांगलंच आहे ,पण यावेळी 132 आमदार भाजपचे आहेत. म्हणून त्यांचा मुख्यमंत्री होईल. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री झाले तरी आनंदच होईल, असंही ते म्हणाले आहेत. 


म्हणून माझं मताधिक्य कमी झालं...


सध्या विरोधकांकडून होत असलेल्या ईव्हीएमच्या आरोपावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले, ईव्हीएम  मशीनने जिंकलो असेल तर मला देखील एक लाख मत मिळायला हवी होती, माझं मताधिक्य वाढायला हवं होतं. ते कमी झालं. मनोज जरांगे पाटील आदल्या दिवशी सकाळी दहा पासून रात्री दोन पर्यंत गावोगावी फिरले आणि जातिवाद पसरवण्याचं काम केलं म्हणून माझं मताधिक्य कमी झालं, असं छगन भुजबळांनी म्हटलं आहे.