पुणे: पुण्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना काल (गुरुवार) घडली. एका 25 वर्षीय अपघातग्रस्त इंजिनीअरला वेळेत मदत न मिळाल्यानं त्याला आपल्या प्राणांना मुकावं लागलं. 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या इंजिनीअरला मदत करण्याऐवजी लोकं फक्त त्याचे फोटो काढत होते.
सतीश प्रभाकर असं या इंजिनीअरचं नाव असल्याचं समजतं आहे. ऑफिसमधून परतत असताना एका अपघातात तो गंभीर जखमी झाला. तो रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असताना लोकांनी त्याचे फोटो, व्हि़डीओ काढले पण एकाही व्यक्तीनं त्याला मदतीचा हात दिला नाही.
त्याचवेळी कार्तिकराज काथे हे डॉक्टर त्याच रस्त्यानं जात असताना त्यांनी सतीशला पाहिलं आणि आपली गाडी थांबवली. त्यानंतर त्यांनी आपल्या गाडीतून सतीशला रुग्णालयात दाखल केलं. तिथे सतीशला मृत घोषित करण्यात आलं.
'मी जेव्हा त्या रस्त्यानं जात होतो त्यावेळी मी या मुलाला खाली पडलेलं पाहिलं. त्याच्या शरीरातून बरंच रक्त वाहत होतं. तिथं बरेच लोकं होते काहीजण तर त्याचा व्हिडीओही काढत होते. पण त्याच्या मदतीसाठी कुणीही पुढे आलं नाही. मी त्याला पाहिलं आणि तात्काळ रुग्णालयात घेऊन गेलो. त्याच्या पोटावर गाडीच्या चाकांचे निशाण होते. डॉक्टरांनी त्याला वाचवण्यासाठी अथक प्रयत्न केले पण दुर्दैवानं त्याचा मृत्यू झाला.' अशी माहिती कार्तिकराज यांनी दिली.
'जर तिथं उपस्थित असणाऱ्या लोकांनी त्याचे फोटो काढण्याऐवजी त्याला रुग्णालयात नेलं असतं तर त्याचा जीव नक्कीच वाचला असता.' असंही काथे म्हणाले.
एका पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, हे हिट अॅण्ड रनचं प्रकरण आहे. सध्या पोलीस उपलब्ध असलेलं सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.
हिट अॅण्ड रन: पुण्यात तरुण इंजिनिअरचा अपघाती मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Jul 2017 02:55 PM (IST)
'मी जेव्हा त्या रस्त्यानं जात होतो त्यावेळी मी या मुलाला खाली पडलेलं पाहिलं. त्याच्या शरीरातून बरंच रक्त वाहत होतं. तिथं बरेच लोकं होते काहीजण तर त्याचा व्हिडीओही काढत होते. पण त्याच्या मदतीसाठी कुणीही पुढे आलं नाही.'
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -