पुणे : 'इलेक्ट्रिक बस'ची अखेर पुण्यात प्रायोगिक तत्त्वावर चाचणी घेण्यात आली आहे. पुढील 7 दिवस भरलेली पोती टाकून शहराच्या सर्व भागातून, मध्यवस्ती, गर्दीच्या ठिकाणी या बसची चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर लवकरच 150 इलेक्ट्रिक बस पुण्याच्या बीआरटी मार्गावर धावणार आहेत. पर्यावरणपूरक आणि सक्षम सार्वजनिक वाहतूकव्यवस्थेसाठी अनेक महिन्यांपासून इलेक्ट्रिक बस चर्चेत आहेत.


पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या दिशेचे पाऊल म्हणून पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात 500 वातानुकूलित ई-बस घेण्याचं लक्ष आहे. तर येत्या दीड वर्षात 2000 बस रस्त्यावर आणण्याचंही ध्येय आहे.


पुणे शहरात सध्या हडपसर ते निगडी या मार्गावर इलेक्ट्रिक बस चाचणी सुरु आहे. या बसमध्ये जीपीएस, मोबाईल चार्जिंग सुविधा, सीसीटीव्ही, आपत्कालीन व्यवस्था, डिजिटल मीटर बॉक्सही बसवण्यात आले आहेत.


पुण्याची वाढती लोकसंख्येच्या तुलनेत उपलब्ध असलेल्या सार्वजनिक बस कमी पडत आहेत. तसेच वाढतं प्रदुषण रोखण्याच्या दृष्टीने पीएमपीएमएलचा हा प्रयत्न आहे. येत्या काळात या बसेसची संख्या वाढवून जुन्या बसेस कमी करण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे प्रदूषण देखील कमी होईल आणि इंधनाचीही बचत होईल, अशी माहिती पीएमपीएमएल संचालक सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली.