पुणे : संपूर्ण देशात दिवाळी फटाके फोडून, फराळ बनवून आणि खाऊन आनंदात साजरी होत आहे. परंतु काही राजकीय नेत्यांची दिवाळी वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. यात माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचा समावेश आहे. पवार कुटुंबीयांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांनी बारामतीमधील त्यांच्या निवासस्थाबाहेर रांगा लागल्या.


बारामतीतील माळेगाव इथल्या 'गोविंद बाग' या निवासस्थानी गेल्या अनेक वर्षापासून पवार कुटुंब एकत्र येत दिवाळी मोठ्या उत्साहात साजरं करतं. यादरम्यान पाडव्याच्या दिवशी दिवाळी भेट हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. यावेळी शरद पवार यांच्यासह अजित पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार, पार्थ पवार यांच्यासह पवार कुटुंबीय हा दिवस सगेसोयरे, कार्यकर्ते पक्षातील नेते यांच्यासाठी देतात.

मागील अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या परंपरेला पवार प्रेमीही भरभरुन प्रतिसाद देतात. यामुळेच एका दिवसात राज्यभरातून हजारो कार्यकर्ते भेट देऊन जातात. त्यामुळे गोविंद बागसमोर कार्यकर्त्यांची भलीमोठी रांग लागलेली असते.