Eknath Shinde In Jejuri: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेतलं..मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते त्यांनी पुणे शहरासह पुरंदर तालुक्यातील सासवड येथे जाहीर सभा घेऊन शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांना संबोधित केले त्यानंतर अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेतले. यावेळी यावेळी भंडाऱ्याची उधळण करीत येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष केला. मुख्यमंत्री पदावर विराजमान असणारे आणि जेजुरीला भेट देणारे एकनाथ शिंदे हे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत अशी माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे.
मार्तंड देवस्थानच्या वतीने एकनाथ शिंदेंना घोंगडी आणि खंडेरायाची प्रतिमा देऊन मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले. तसंच खंडोबाचा खंडा देखील एकनाथ शिंदेनी आणि खासदार श्रीरंग बरणेंनी उचलला. एकनाथ शिंदे सोबत विजय शिवतारे, शिवाजी आढळराव पाटील, तानाजी सावंत, श्रीरंग बारणे उपस्थित होते.
यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्यात येणार आहे. एकनाथ शिंदे सायंकाळी 7 वाजता पुण्यातील कात्रज चौकात आमदार तानाजी सावंत यांच्या घरी भेट देणार आहेत. याचवेळी शिवसेना नेते आदित्य ठाकरे कात्रज परीसरात सभा घेणार आहे. एका शहरात, एकाच दिवशी ठाकरे शिवसेना आणि शिंदे शिवसेना आमने-सामने येणार असल्याची शक्यता आहे. हे आमने-सामने आल्यावर नेमकं काय होणार?, याकडे दोन्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं लक्ष लागलं आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडल्यानंतर युवानसेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे बंडखोराच्या मतदारसंघात शिवसंवाद यात्रा काढत आहेत. त्यासाठी आदित्य ठाकरे पुण्यात येणार आहे.
बंडखोर नाही आणि नव्हतो...
आम्ही जर बंडखोर आणि गद्दार असतो तर महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला स्वीकारलं नसतं. एवढ्या मोठ्या संख्येने सभेला लोक आले नसते. याचा अर्थ आमची भूमिका या जनतेने स्वीकारली आहे. मी काम करणारा कार्यकर्ता आहे फाईलींमध्ये काम करणारा नाही. सरकार बदललं आहे. बाळासाहेबांचं आणि प्रमाेद महाजनांंचं सरकार आलं आहे, त्यामुळे नक्कीच योग्य काम होईल, असं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांना संबोधित करताना व्यक्त केलं आहे.