Vijay Shivtare In Purandar: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांवर, आमदारांवर अन्याय केला. जे मतदार शिवसेनेसोबत होते त्या मतदारांचा अपमान केला, त्यांना धोका दिला. ठाकरे-पवार तुम्हाला देव माफ करणार नाही तुम्ही संपले आहात, असा हल्लाबोल माजी मंत्री विजय शिवतारे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केला. उद्धव ठाकरे यांनी 3 वर्षात जे अन्याय केले ते अन्याय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 30 दिवसांत संपवले आहेत. बारामतीकरांनी महाराष्ट्रातलं सात्विक राजकारण संपवलं, असंही ते म्हणाले
सर्व ठिकाणी आमच्या 40 आमदारांबाबत अपशब्द वापरत आहेत. मी पाया पडून सांगतो. एकनाथ शिंदे आम्हा 40 आमदारांना घेऊन गेले नाही तर आम्ही त्यांना घेऊन गेलो, असं शाहाजी बापूंनी सांगितलं ते खरं आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसपासून वेगळे व्हा, अशा अनेक विनवण्या मी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांना केली होती. अनेक विनवण्याकरुन देखील त्यांनी ते ऐकलं नव्हतं आणि आता तेच सगळ्याांबाबत अपशब्द वापरत आहेत तर कोणाला गद्दार म्हणत आहेत. या राष्ट्रवादीने आम्हाला दाबून ठेवलं होतं. याची जनता साक्षीदार आहेत, असाही हल्लाबोल त्यांनी केला
गुंजवणीच्या पाण्यासाठी आम्ही लढा दिला. 1999 ते 2000 पर्यंत राष्ट्रवादीचं सरकार होतं तेव्हा एक वीट देखील लागली नाही. मी मंत्री झाल्यावर अडीच वर्षात ते धरण बांधलं. मात्र त्यावेळी अजित पवारांनी देखील साथ दिली नव्हती. आंदोलन केलं. ही सगळी योजना केली आणि महाविकास आघाडीसारखं भकास सरकार आलं. पहिल्याच कॅबिनेटच्या बैठकीत अजित पवारांनी पावने चार टीएमसी पाणी बारामतीसाठी पळवून नेलं आणि आता तेच आजित पवार आमचा राग करतात, असंही ते म्हणाले.
जिल्हा बॅंकेचे पैसे भरायचे, करोडो रुपये लुटायचे, राज्य सहकारी बँकेचे पैसे भरायचे आणि 50-60 कोटी हानायचे यासाठी अजित पवारांनी राष्ट्रीय बाजार यशवंत साखर कारखान्याजवळ नेला, अशी टीका त्यांनी केली आहे. 50 वर्षांत पुरंदरला काय दिलं असं शरद पवारांना विचारल्यावर सासवडला पाणी दिलं असं त्यांनी मला सांगितलं होतं. लोकसभेची निवडणूक होती म्हणून त्यांनी सासवडला पाणी दिलं होतं. तुम्ही आम्ही प्रकल्प आणले. त्यात पवारांचा काहीही संबंध नव्हता. पुरंदरच्या विमानाचा प्रकल्प आणला तेव्हा त्यांनी माझं अभिनंदन केलं होतं. त्यांनी 50 वर्षांत आम्हाला काय दिलं?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.