Subodh Bhave In Pune: ज्यांची लायकी नाही अशा राजकारणांच्या हाती देश सोपवून आपण मोकळे झालो आहोत. त्याचबरोबर आपल्याला असं वाटतंय की ते जे नालायक राजकारणी आहेत ते आपल्या देशाचा विचार करतील. मात्र  त्यांनी मागच्या काही वर्षांत जे काही करुन ठेवलं आहे. ते आपल्या समोर आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात टिळक आणि आगरकर ज्या पद्धतीने देशाचा विचार करायचे तसं आता होताना दिसत नाही असं म्हणत सध्याचे राजकारण आणि राजकारणी यांच्यावर सुबोध भावे यांनी टीका केली आहे. ते पुण्यात बोलत होते.



पुण्यातील  डेक्कन एज्युकेशन सोसायटीकडून 'शतसूर्याचे तेज' या लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारित नाट्य, संगीत आणि नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमात सुबोध भावे यांना प्रमुख पाहूणे म्हणून बोलावलं होतं . डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे अध्यक्षस्थानी होते. तर डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते.


राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या मुंबईबाबतच्या वादग्रस्त विधानामुळे सगळ्या स्तरावरून त्यांच्यावर टीका होत आहे. त्यात आता अभिनेते सुबोध भावेंनी देखील त्यांच्यावर टीका केली आहे. आपण शिक्षण घेतो, नोकरी शोधतो, उत्तम काम करतो मात्र लायकी नसणाऱ्या राजकारण्यांच्या हाती देश दिला आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.


नोकर निर्माण करण्यासाठी ब्रिटीशांना शिक्षणाची गरज वाटली. त्यांना मालक निर्माण करायचे नव्हते.  त्यामुळे आजही आपण शिक्षणाच्या माध्यमातून नोकरच निर्माण करत आहोत. याच कारणामुळे मुंबई, महाराष्ट्रातून काही लोक निघून गेले, तर पैसेच राहणार नाहीत, अशी वक्तव्ये काही राजकारणी करतात, असंही ते म्हणाले. 


सावित्रीबाई फुलेंनी पहिली मुलींची शाळा उभारली. आगरकर, माधवराव रानडे यांना देश सेवा करायची होती. समाज घडवायचा होता. वेळ जात नव्हता आणि त्यांना नाचायचं होतं म्हणून लोकमान्यांनी गणेशोत्सव सुरु केला नव्हता. या सगळ्या मागे समाजाचा विचार होता, असंही ते म्हणाले