पुणे : तेलही गेलं आणि तुपही गेलं, हाती लागलं धुपाटणं, अशीच काहीशी परिस्थिती भाजपने पुण्यात उमेदवारी दिलेल्या दोन उमेदवारांची झाली आहे.

कारण पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 7 साठी भाजपकडून एबी फॉर्म मिळवणारे रेश्मा भोसले आणि सतिश बहिरट, या दोघांवरही अपक्ष निवडणूक लढण्याची नामुष्की ओढवली आहे.

भाजपचे उमेदवार म्हणून रेश्मा भोसले आणि सतिश बहिरट या दोघांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाने बाद केला आहे. प्रभाग क्रमांक 7 साठी भाजपने रेश्मा भोसले आणि सतिश बहिरट यांना एबी फॉर्म दिला. मात्र रेश्मा भोसले यांनी राष्ट्रवादीच्या नावाने अर्ज भरला आणि त्याला भाजपचा एबी फॉर्म जोडला. त्यामुळं त्यांचा अर्ज बाद करण्यात आला.

तर भाजपने रेश्मा भोसलेंना अधिकृत उमेदवार जाहीर केल्यामुळे बहिरट यांचाही अर्ज बाद केला. मात्र रेश्मा भोसले आणि सतिश बहिरट यांना अपक्ष म्हणून निवडणूक लढता येणार आहे.  दरम्यान भाजपच्या दुटप्पी भूमिकेवर सतिश बहिरट यांनी सडकून टीका केली आहे.