पुणे : सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ दारू पित बसलेल्या टोळक्याला हटकल्याने झालेल्या वादातून कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी जखमी झाल्या आहेत. शनिवारी सायंकाळी हा प्रकार कोथरूड परिसरात घडला. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.


या प्रकरणी अधिक माहिती अशी की, शनिवारी सायंकाळी कोथरूड येथील सहजानंद सोसायटीच्या प्रवेशद्वारावर काही तरुण दारू पित बसले होते. यावेळी सोसायटीतील एक नागरिक कुत्रा बाहेर निघून निघाले होते. त्यांनी या टोळक्याला येथे बसू नका म्हणत हटकले. त्यानंतर या टोळक्याने संबंधित नागरिकासोबत कुत्रा अंगावर सोडतो का म्हणत वाद घातला. त्यामुळे घाबरलेला हा नागरिक पुढे निघाला असता त्यातील एकाने त्यांच्या दिशेने बाटली फेकून मारली. यावेळी दोन तरुण भांडण सोडविण्यासाठी पुढे आले असता त्यांनाही या टोळक्याने मारहाण केली.

दरम्यान गोंधळ सुरू असलेल्या ठिकाणी माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि सोसायटीतील इतर नागरिकही पोहोचले. परंतु दारूच्या नशेत असलेले हे टोळके काही ऐकून घेण्याच्या परिस्थितीत नव्हते. त्यांनी सर्वांना धक्काबुक्की करत बघून घेऊ अशी धमकी देखील यावेळी दिली. या दरम्यान झालेल्या झटापटीत मेधा कुलकर्णी यांच्या हाताला किरकोळ जखम झाली. एका महिलेने याप्रकरणी तक्रार दिली असून कोथरूड पोलिसात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोघांना पोलिसांनी अटक केली.
दरम्यान यावर बोलताना मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, कोथरूड परिसरातील गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला नसल्याचे वारंवार घडणाऱ्या घटनांमधून स्पष्ट होते. मारामारी, छेडछाड, किरकोळ कारणावरून गाड्यांची तोडफोड अशा घटना या परिसरात नित्याच्या झाल्या आहेत. आजच्या घटनेतही आरोपी पळून जात असताना पोलीस काहीच करू शकले नाही. पोलीस समोर उभे असताना संबंधित तरुण अश्लील भाषेत शिवीगाळ करीत होते. यावरून त्यांना कुठलेच भय नसल्याचे स्पष्ट होते. कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लक्ष घालावे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.


कोण आहेत मेधा कुलकर्णी

मेधा कुलकर्णी या 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. मराठा मोर्चावर केलेल्या वादग्रस्त विधानामुळेही त्या मध्यंतरी चर्चेत आल्या होत्या. काही मराठा संघटनांनी त्यांच्या घरासमोर आंदोलन केले होते. तर काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांचा पत्ता कापून त्यांच्या जागी विद्यमान आमदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे उभे राहिले होते. त्यानंतर निवडणुकीदरम्यान त्यांनी जाहीरपणे पक्षाविरोधात नाराजी व्यक्त केली होती.