Pune Accident News: पुणे-सातारा महामार्गावर धक्कादायक घटना घडली आहे.  पुणे-सातारा महामार्गावरून प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एसटीच्या बस चालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी त्याला चक्कर आल्यासारखं वाटल्यानं बस चालकाने प्रसंगावधान राखून एसटी रस्त्याच्या कडेला नेली. त्यामुळे 25 प्रवाशांचा जीव वाचला. मात्र चालकाचा मृत्यू  झाला. या मृत्यूमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. जालिंदर रंगराव पवार असे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्या बसचालकाचे नाव आहे. ते सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पळशी या गावाचे रहिवासी होते. बस सुसाट वेगाने होती मात्र प्रसंगावधान दाखवत त्यांनी बस थांबवली. त्यांच्या या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आहे.


राज्य परिवहन महामंडळाची पालघर विभागाच्या वसई आगाराची एसटी बस, म्हसवडकडे प्रवाशांना घेऊन निघाली होती. पुणे-सातारा महामार्गावरील वारवे (भोर) गावाच्या शिवारात बुधवारी दुपारी ही दुर्दैवी घटना घडली. याप्रकरणी वाहक संतोष गवळी यांनी राजगड पोलीस ठाण्यात नोटीस दिली.


वसईहून एसटी बस बुधवारी दुपारी 12.30 वाजता स्वारगेट बसस्थानकात आली होती. यावेळी बसचालक संतोष कांबळे यांच्या जागी जालिंदर पवार हे बदली चालक म्हणून आले. खेड शिवपूर टोलनाका पार करून वरवे गावच्या हद्दीत आल्यानंतर एसटी बसचा वेग मंदावला. याबाबत कंडक्टरने बसचालक जालिंदर पवार यांना कारण विचारल्यावर त्यांनी चक्कर येत असल्याचं सांगून बस रस्त्याच्या कडेला थांबवली. वाहकाला पवार यांच्याशी पुन्हा बोलायचं होतं मात्र त्यांनी उत्तर दिले नाही. त्यानंतर वाहकाने त्याला प्रवाशांच्या मदतीने नसरपूर येथील खासगी रुग्णालयात नेले. उपचारापूर्वीच त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं आहे.


बदली चालक म्हणून आले अन् जीव गेला


वसईहून एसटी बस स्वारगेटला आली होती. त्या बसला  जालिंदर पवार हे बदली चालक होते.  चालक आणि वाहक दोघेही स्वारगेटवरुन बस घेऊन निघाले.  बस चालकाच्या जाण्याने सहकारी ST कर्मचाऱ्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.